"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 19:11 IST2026-04-03T19:09:43+5:302026-04-03T19:11:20+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी पोस्ट करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रम्प यांची नवी पोस्ट होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबद्दलचे आहे.

"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
"अमेरिकेला आणखी थोडा वेळ मिळाला, तर आम्ही सहजपणे होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करू शकतो; तेल घेऊ शकतो आणि प्रचंड नफा कमावू शकतो", असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनी सुरु करण्यावर जास्त भर दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ज्या देशांमध्ये होर्मुझ मार्गे तेल आयात केली जाते त्यांनी अमेरिकेला साथ देण्यासाठी युद्धनौका पाठवाव्यात असे म्हटले होते.
तेल-गॅस वाहतुकीच्या जल मार्गांपैकी एक महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणकडूनयुद्ध सुरू झाल्यानंतर तेल आणि गॅस जहाजांवर हल्ले केले गेले. आता काही देशांची जहाजे ये-जा करत असले तरी पूर्णपणे ही सामुद्रधुनी सुरू झालेली नाही.
होर्मुझ सुरू करण्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिनाभरापासून वेगवेगळी विधान करताना आणि हल्ल्याची भूमिका घेताना दिसले आहेत. त्यात आता त्यांनी पुन्हा नवीन विधान केले.
ट्रम्प म्हणाले, 'जगासाठी तेलाचा महापूर आल्यासारखेच असेल'
अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "आम्हाला थोडा वेळ मिळाला तर आम्ही होर्मुझ सहजपणे सुरु करू शकतो आणि तेल घेऊन प्रचंड नफा कमावू शकतो. हे जगासाठी तेलाचा महापूर आल्यासारखेच असेल."
मागील काही दिवसांपासून ट्रम्प इराणविरोधात उलटसुलट भूमिका घेताना दिसत आहे. एकीकडे युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू असल्याचे दावे करताना दुसरे ट्रम्प यांच्याकडून इराणची अवस्था अश्मयुगासारखी करू, असेही म्हणत आहेत.
कुवैतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर इराणचे हल्ले
युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशांनाही याच्या झळा बसत आहे. इराणकडून काही आखातील देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांनाही लक्ष्य केले जात आहे. कुवैतमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा ड्रोन हल्ले करण्यात आले.
कुवैतची सरकारी वृत्तसंस्था कूनाने दिलेल्या रिपोर्टनुसार सरकारी तेल कंपनी कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मीना अल अहमदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला करण्यात आला.
हल्ल्यानंतर तेल शुद्धीकरण प्रकल्पातील काही यूनिट्समध्ये आग लागली. त्यामुळे तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण हा हल्ला दुर्दैवी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
अमेरिकेचा युद्धावर ११.३ अरब डॉलर खर्च
अमेरिकन माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार मागील महिन्यात म्हणजे युद्ध सुरू होऊन सहा दिवस झाल्यानंतर पेटागनने अमेरिकेच्या संसदेला सांगितले की, युद्धावर ११.३ अरब डॉलर खर्च झाला आहे. या युद्धामध्ये शेकडो टॉमहॉक मिसाईल्स वापरल्या गेल्या आहेत. एका टॉमहॉक मिसाईलची किंमत ३५ लाख डॉलर म्हणजे ३२ कोटी रुपये इतकी आहे.