अश्लील फोटो प्रकरणी प्रेयसी ॲश्ले सेंट क्लेयरने इलॉन मस्कला खेचलं कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:44 IST2026-01-24T13:42:52+5:302026-01-24T13:44:45+5:30
ॲश्ले सेंट क्लेयर ही मस्क यांच्या मुलांपैकी एकाची आई आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी/गर्लफ्रेंड.

अश्लील फोटो प्रकरणी प्रेयसी ॲश्ले सेंट क्लेयरने इलॉन मस्कला खेचलं कोर्टात
इलॉन मस्क यांना कोण ओळखत नाही? जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांपैकी ते एक आहेत, यात आता तसे काही विशेष अप्रूप राहिलेले नाही; पण कोणत्या ना कोणत्या वादाने ते कायम चर्चेत असतात आणि लोकही हे वाद आवडीनं चघळतात. हे वाचल्यावर तुम्ही विचारालच, आता कुठल्या नव्या वादात ते अडकलेत? - बरोबर आहे. आता आणखी एका नव्या वादामुळे जगभरात त्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. इलॉन मस्क आणि त्यांची प्रेम प्रकरणे, त्यांची औरस आणि अनौरस मुले यासंदर्भातही आजवर खुपदा चर्चा झाली आहे. आताचा वादही मस्क यांच्या मुलाच्या आईच्या म्हणजेच त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या निमित्ताने सुरू झाला आहे; पण विषय मात्र एकदम नवा आहे.
ॲश्ले सेंट क्लेयर ही मस्क यांच्या मुलांपैकी एकाची आई आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी/ गर्लफ्रेंड. ॲश्लेने मस्क यांच्या मालकीच्या ग्रोक या चॅटबॉटवर न्यायालयात नुकतीच केस ठोकली आहे. बिकिनी घातलेला तिचा आक्षेपार्ह फोटो ग्रोक या चॅटबॉटने तयार केला. तो व्हायरल झाला आणि त्यामुळे आपली बदनामी झाली म्हणून ॲश्लेने ग्रोकच्या म्हणजेच मस्क यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.
मार्च २०२३ मध्ये इलॉन मस्क यांनी xAI ही कंपनी स्थापन केली. ग्रोक हा एआय चॅटबॉट xAI या कंपनीने विकसित केला आहे. ग्रोकने तयार केलेल्या फोटोमध्ये ॲश्ले जेव्हा १४ वर्षांची होती, तेव्हाच्या एका जुन्या फोटोमध्ये बदल करून तिला बिकिनी घातलेली दाखवण्यात आले आहे. ग्रोकने युजर्सना तिचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो तयार करण्याची परवानगी दिली, त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास आणि बदनामी सहन करावी लागली, असा ॲश्लेचा आरोप आहे. लेखिका आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या २७ वर्षांच्या ॲश्ले सेंट क्लेयरने याविरुद्ध न्यूयॉर्कच्या स्टेट सुप्रीम कोर्टात नुकताच दावा दाखल केला आहे.
मस्क मात्र यावर गप्प बसले नाहीत. त्यांनी xAI कंपनीच्या वतीने न्यायालयात काउंटर केस दाखल करताना उलट ॲश्लेनेच आपल्या युजर ॲग्रीमेंटचे उल्लंघन केल्याचा दावा करताना तिच्याकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीविरोधात केस फक्त टेक्सासच्या फेडरल कोर्टातच दाखल करता येते.
ॲश्लेचे म्हणणे आहे, या डीपफेक फोटोंबद्दल तिने मागच्या वर्षीच ‘एक्स’कडे तक्रार करून फोटो हटवण्याची मागणी केली होती. ‘एक्स’ने तिच्या संमतीशिवाय तिच्या फोटोचा वापर किंवा एडिटिंग केले जाणार नाही, अशी खात्री दिली. मात्र, ॲश्लेचा दावा आहे की तिने तक्रार केली, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून उलट सूडभावनेतून तिला आणखी त्रास देण्यात आला.
ॲश्ले म्हणते, माझे प्रीमियम ‘एक्स’ सब्सक्रिप्शन आणि व्हेरिफिकेशन चेकमार्क काढून टाकण्यात आले. माझे सुमारे १० लाख फॉलोअर्स असले तरी माझ्या अकाउंटचे ‘मॉनेटायझेशन’ बंद करण्यात आले. म्हणजेच तिच्या अकाउंटच्या माध्यमातून तिला जे पैसे मिळत होते, जी कमाई होत होती ती थांबवण्यात आली. तिला त्यातून काहीच पैसे मिळणार नाहीत, याची ‘व्यवस्था’ करण्यात आली. एवढेच नाही, तिचे जे अपमानास्पद बनावट फोटो ‘एक्स’वर होते, तेही तसेच राहू दिले गेले!