Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:34 IST2025-09-10T09:31:13+5:302025-09-10T09:34:02+5:30

Genz Protests Nepal Reason: 'जेन झी' या तरुणांच्या संघटनेने मंत्र्यांच्या, नेत्यांच्या तसेच बड्या उद्योजकांच्या मुलांची ऐषआरामी जीवनशैली उघडकीस आणणारे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती.

Genz Protests Nepal: Nepal is engulfed in the fire of youth! Leaders are burning with corruption, social media ban adds fuel | Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

काठमांडू: नेत्यांच्या भ्रष्टाचाराला संतापलेल्या तरुणांनी संपूर्ण नेपाळ पेटवले आहे. या आंदोलनाची सुरुवात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे झाली. 'जेन झी' या तरुणांच्या संघटनेने मंत्र्यांच्या, नेत्यांच्या तसेच बड्या उद्योजकांच्या मुलांची ऐषआरामी जीवनशैली उघडकीस आणणारे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती.

नेपाळमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी आंदोलन सुरू झाले. मात्र यावेळी एका पोलिसाने तरुणावर गोळी झाडली. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला तो थांबलेला नाही.

'केपी चोर, देश छोड'

'जेन झी' या संघटनेने पुकारलेल्या जनआंदोलनात 'केपी चोर देश छोड', भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करा अशा घोषणा, निदर्शने करत आहेत. 'विद्यार्थ्यांना मारू नका' अशा घोषणा देत निदर्शकांनी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले. 

कालंकी येथे आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद पाडली. ललितपूरमधील सुनाकोठी येथे दळणवळण मंत्री गुरूंग यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. गुरुंग यांनीच समाजमाध्यमांवरील बंदी लागू केली होती. माजी पंतप्रधान देउबा यांच्या बुढानीलकंठातील घराचीही तोडफोड करण्यात आली.

नेपाळ-भारत सीमेवरील सुरक्षा केली अधिक कडक

भारत-नेपाळ दरम्यान १७५१ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील सर्व चेकपोस्ट आणि संवेदनशील ठिकाणी सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या दलाने सुरक्षा अधिक कडक केली आहे.

सीमेवर एसएसबीचे जवान व पोलिसांचे संयुक्त गस्तीदल तयार करण्यात आले असून, 'ऑपरेशन कवच' अंतर्गत तयार करण्यात आलेल्या समित्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुरक्षा मोहिमेची धुरा लष्कराकडे

ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यामुळे नेपाळचे लष्कर येथील सुरक्षा मोहिमेची धुरा सांभाळणार आहे. या संकटात नागरिकांनी सहकार्य करावे आणि विध्वंसक हालचालींमध्ये सहभागी होऊ नये, त्यांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही लष्कराने केले आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडियावर किती जण?

फेसबुक - १.३५ कोटी
इन्स्टाग्राम - ३६ लाख

ओलींचा राजीनामा; चीनने बाळगले मौन

पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यावर चीनने अजूनही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ओली यांना चीनविषयी प्रेम, आस्था असल्याचे असे मानले जात होते. त्यांनी चीनकडे झुकणारी भूमिका स्वीकारून नेपाळमधील भारत-केंद्रित धोरणात बदल केले होते. काही दिवसांपूर्वीच ओली चीनमध्ये गेले होते.

भारताने केली विमानसेवा बंद

एअर इंडियाच्या दिल्ली ते काठमांडू चार फेऱ्या रद्द. इंडिगो व नेपाळ एअरलाइन्सची उड्डाणे रद्द, काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद.

शांतता राखण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे. त्यात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे जाणून खूप दुःख झाले. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांतता राखण्याचे नम्र आवाहन करतो.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Genz Protests Nepal: Nepal is engulfed in the fire of youth! Leaders are burning with corruption, social media ban adds fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.