नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:02 IST2025-09-09T00:01:39+5:302025-09-09T00:02:50+5:30
लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी, सोमवारच्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संयंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लेखक यांनी, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका मंत्र्यांनी सांगितले. जनरेशन-झेडच्या निदर्शकांनी सोमवारी केलेल्या निदर्शन हिंसक बनले असून आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
काय म्हणाले लेखक? -
लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.
काठमांडूची परिस्थिती नियंत्रणाबाहेर -
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये या निदर्शनाचा सर्वाधिक परिणाम झाला. स्थानिक प्रशासनाने चार महत्त्वाच्या भागात कर्फ्यू लागू केला आहे. यात शितल निवास (राष्ट्रपती कार्यालय), महाराजगंज परिसर, ग्रीन हाऊस (उपराष्ट्रपती कार्यालय), लैनचौर परिसर, रायणहिटी दरबार संग्रहालय परिसर आणि सिंह दरबार परिसर यांचा समावेश आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला फिरण्याचा, सभा घेण्याचा,ने मिरवणूक काढण्याचा अथवा निषेध करण्याचा अधिकार नाही. रात्री १० वाजेपर्यंत या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काठमांडूमध्ये लागू केलेल्या या कर्फ्यूचा उद्देश परिस्थिती नियंत्रित करणे आणि सुरक्षा राखणे असल्याचे सांगितले जात आहे.
...म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -
नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.