गॅस स्टेशनचा स्फोट

By Admin | Updated: June 5, 2015 01:29 IST2015-06-05T01:29:48+5:302015-06-05T01:29:48+5:30

घानाच्या राजधानीत पाऊस आणि पुरापासून बचावासाठी ‘गॅस स्टेशन’मध्ये आश्रय घेणे लोकांच्या जीवावर बेतले. बुधवारी रात्री अचानक झालेल्या स्फोटाने स्टेशनच्या चिंधड्या उडाल्या.

Gas station explosion | गॅस स्टेशनचा स्फोट

गॅस स्टेशनचा स्फोट

अकरा (घाना) : घानाच्या राजधानीत पाऊस आणि पुरापासून बचावासाठी ‘गॅस स्टेशन’मध्ये आश्रय घेणे लोकांच्या जीवावर बेतले. बुधवारी रात्री अचानक झालेल्या स्फोटाने स्टेशनच्या चिंधड्या उडाल्या. यात ७३ नागरिक ठार झाले. घटनास्थळीचे दृृश्य भयंकर होते. सर्वत्र जळालेल्या मृतदेहांचा सडा पडला होता, तर आसपासच्या इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.
मृतदेह गोळा करण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली, असे घाना अग्निशमन सेवेचे प्रवक्ते बिली अनाग्लेट यांनी सांगितले.
रात्री झालेल्या या स्फोटाचे कारण लगेचच समजू शकले नाही. या भागात प्रचंड पूर आला असल्याने अनेकांनी गॅस स्टेशनमध्ये आश्रय घेतला होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रीय चॅनलवर दाखविण्यात आलेल्या फुटेजमध्ये पिकअप ट्रकच्या मागील भागात एकमेकांवर रचण्यात आलेले मृतदेह आणि गॅस स्टेशनच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह दाखविण्यात आले. हा स्फोट एवढा भयंकर होता की, स्टेशनजवळील काही इमारतींना आग लागली. त्यातच पुराने थैमान घातल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. अकराच्या मध्यवर्ती भागातील क्वामे नक्रुमाह चौकाजवळ ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)

Web Title: Gas station explosion