"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 22:45 IST2025-05-03T22:44:58+5:302025-05-03T22:45:41+5:30
"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे...

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडूनपाकिस्तानविरुद्ध करण्यात येत असलेल्या कारवाईसंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जॉन बोल्टन यांनी मोठे विधान केले आहे. "दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतालापाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे.
आयएएनएसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोल्टन म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना स्थिर वातावरणात जगू दिले जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सीमेपलीकडून सातत्याने दहशतवादी कारवाया करून पर्यटकांना या प्रदेशात जाण्यापासून रोखले जात आहे."
पुलवामा हल्ल्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते बोल्टन -
पुलवामा येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान बोल्टन हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने केला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफच्या जवानांना हौतात्म्य आले होते.
भारताला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार -
बोल्टन म्हणाले, "मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना, आम्हाला २०१९ मध्ये अशाच परिस्थितींचा सामना करावा लागला होता. तेव्हा पाकिस्तानी भूमीतून दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी आम्ही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली होती. त्यावेळी, जर भारत सरकारला विश्वास असेल की, हा हल्ला पाकिस्तानी भूमीतून झाला, पाकिस्तान सरकार तो रोखण्यास अयशस्वी ठरले अथवा पाकस्तानने त्यास काही मदत केली, तर नवी दिल्लीला स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असा आमचा दृष्टिकोन होता
दक्षिण आशियात व्यापक संघर्ष पाहण्याची कुणाचीही इच्छा नाही -
संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे माजी राजदूत बोल्टन म्हणाले, "मला वाटते, हाच सिद्धांत आजही लागू होतो. माझ्या मते, जर सैन् कारवाईचा निर्णय घेतला गेला तर तो योग्य सिद्ध करणारी कारणेही त्यांच्याकडे असायला हवीत, हे भारताच्या हिताचे आहे. दक्षिण आशियात व्यापक संघर्ष बघण्याची कुणाचीही इच्छा नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्यांचा धोका, ही अशी गोष्ट आहे, जी कुणीही सहन करू नये. यामुळे, प्रत्युत्तर आणि स्वसंरक्षण पूर्णपणे स्वीकार्य आहे."
जम्मू-काश्मिरातील पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये २२ एप्रिलला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.