मॉस्को/ वॉर्सा : रशिया आणि बेलारूसने शुक्रवारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह हजारो सैनिकांचा समावेश असलेला ‘झापाड-२०२५’ संयुक्त लष्करी सराव सुरू केल्याने युरोपात तणाव वाढला आहे. या लष्करी सरावातून रशियाने डिवचल्याने पोलंडही सज्ज झाला असून, बेलारूस सीमेवर या देशाने ४० हजार सैनिक तैनात केले आहेत. दुसरीकडे फ्रान्सही सतर्क झाला असून, आपली आधुनिक लढाऊ जेट विमाने या देशाने पोलंडच्या दिशेने रवाना केली आहेत.
तणावाच्या आगीत तेल
रशिया - बेलारुसदरम्यानचा हा लष्करी सराव मंगळवारपर्यंत चालणार आहे. साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा सराव तणावाच्या आगीत तेल ओतणारा ठरला आहे. दरम्यान, या आठवड्याच्या प्रारंभी पोलिश हवाई क्षेत्रात रशियन ड्रोनच्या घुसखोरीने या तणावात भर पडली. पोलंड आपले लक्ष्य नसल्याचा खुलासा रशियन लष्कराने केला असला तरी हा प्रकार चिथावणीखोर असल्याचे युरोपीयन देशांच्या नेत्यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच पोलंडच्या रुपाने युरोपात पुन्हा तणाव निर्माण झाला असून, पाश्चिमात्य जग नकळत युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी म्हटले आहे. रशियन ड्रोननी १९ वेळा पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता.
‘पॅलेस्टाईन राज्य कधीही होणार नाही’
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की पॅलेस्टाईन राज्य कधीही निर्माण होणार नाही. एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करताना त्यांनी हे विधान केले.
या करारानुसार, ई१ सेटलमेंट प्रकल्प पुढे नेला जाईल, यात जेरुसलेमजवळील १२ चौरस किलोमीटर क्षेत्रात हजारो नवीन घरे, रस्ते आणि पायाभूत सुविधा बांधल्या जातील. प्रकल्पाची किंमत ८,४०० कोटी रुपये आहे.
आर्टिकल-४ सुरू
या तणावात पोलंडनेही ‘नाटो’च्या माध्यमातून आर्टिकल-४ची कारवाई सुरू केली आहे. यानुसार नाटोचे सदस्य देश एकत्रित युरोपच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करतात. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनेही आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
पोलंडचाही युद्धसराव
बेलारुस सीमेवर रशियाच्या हालचाली पाहता पोलंडनेही युद्धसराव सुरू केला असून, सीमेवरील तैनातीशिवाय इतर ३० हजार सैनिक व ६००हून अधिक शस्त्रसज्ज युनिट संभाव्य जोखीमीशी निपटण्यासाठी सराव करीत आहेत.