दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच समुद्रात 'टॉरपीडो हल्ला'! "अमेरिका पस्तावणार..."; IRIS Dena बुडवल्यानंतर इराणचा भडका उडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:02 IST2026-03-05T14:02:17+5:302026-03-05T14:02:37+5:30
या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून, आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच समुद्रात 'टॉरपीडो हल्ला'! "अमेरिका पस्तावणार..."; IRIS Dena बुडवल्यानंतर इराणचा भडका उडाला
इस्रायल-अमेरिका आणि इराणयुद्ध आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. हिंदी महासागरात इराणचीयुद्धनौका 'IRIS Dena' अमेरिकन पाणबुडीने टॉरपीडो डागून बुडवली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, ही युद्धनौका भारतात आयोजित एका नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून, आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला थेट इशारा -
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी या हल्ल्याचा कडाडून निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणच्या जहाजावर हल्ला करणे हा 'समुद्रातील मोठा गुन्हा' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अराघची यांनी माहिती दिली की, या जहाजात सुमारे १३० नाविक होते आणि ते नुकतेच भारतीय नौदलासोबत सराव करून परतत होते. या कारवाईचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,असेही ते म्हणाले.
श्रीलंकेजवळ बुडवली इराणी युद्धनौका:
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या एका पाणबुडीने श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ हिंदी महासागराच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इराणच्या 'IRIS Dena' या फ्रिगेटला लक्ष्य केले. भारतासोबतच्या संयुक्त नौदल सरावातून परतत असताना हा हल्ला झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच टॉरपीडोचा वापर करून शत्रूचे जहाज बुडवले आहे, ज्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.