आधी अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर युद्धविराम प्रस्ताव, नुकसानभरपाई द्या; इराणची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 06:52 IST2026-03-26T06:51:08+5:302026-03-26T06:52:56+5:30
अमेरिकेने इराणला युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविला आहे.

आधी अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर युद्धविराम प्रस्ताव, नुकसानभरपाई द्या; इराणची मागणी
तेहरान : अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या युद्धनौकेवर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा दावा इराणने बुधवारी केला; पण त्याला अमेरिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अमेरिकेने इराणला युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविला आहे. तसा दावा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, आता इराणनेही स्वतःचा युद्धविराम प्रस्ताव जारी केला असून, त्यात युद्ध नुकसानभरपाई आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपले सार्वभौमत्व मान्य करण्याची मागणी केली आहे.
त्याआधी अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावाची इराणने खिल्ली उडवली व चर्चेची शक्यता फेटाळली होती. पश्चिम आशियामध्ये अमेरिकेने पॅराट्रूपर पाठवण्यास सुरुवात केली असतानाच दुसऱ्या बाजूला त्या देशाने युद्धविरामाचा प्रस्ताव इराणला पाठविला. त्यात पाकिस्तानने मध्यस्थीचे काम केले. त्याबाबत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रस्तावात निर्बंधांमध्ये सवलत, नागरी अणू सहकार्य, इराणच्या अणू कार्यक्रमात कपात तसेच इतर मुद्यांचा समावेश आहे.
इस्रायलचे इराणमधील पायाभूत सुविधांवर हल्ले
इस्रायलने मात्र आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत बुधवारी पहाटे इराणमधील काझविन शहरात सरकारी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल शेजारी देशांवर हल्ले सुरू ठेवले. सौदी अरेबियाने आपल्या पूर्व प्रांतात इराणचे किमान आठ ड्रोन पाडल्याचे सांगितले, तर बहारीनमध्येही सायरन वाजले. कुवेतनेही इराणचे अनेक ड्रोन पाडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, आम्ही कधीही अण्वस्त्रे बाळगणार नाही असे इराणने सांगितले असून, होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित एक घोषणा तो देश करणार आहे. तीन आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेला विजय मिळाल्याचा दावाही त्यांनी पुन्हा केला आहे.
अमेरिकेने आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या
युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवितानाच अमेरिकेने आपल्या लष्करी हालचालीही सुरू ठेवल्या आहेत. या देशाच्या ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे किमान १,००० सैनिक पश्चिम आशियात पाठवले जातील, या क्षेत्रात अमेरिका दोन मरीन युनिट पाठविण्याच्या विचारात आहे.
इराणच्या नेतृत्वात मोठे बदल : अमेरिकेचा दावा
इराणच्या सध्याच्या नेतृत्वात मोठे बदल झाले आहेत असाही दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिका इराणशी चर्चा करत आहेत. मात्र, ही चर्चा कोणाशी सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. इराणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
‘शेजारी देशांवरील हल्ले इराणने थांबवावेत’
शेजारी देशांवर सुरू असलेले हल्ले इराणने तातडीने थांबवावेत. अन्यथा त्याचे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात, तेलपुरवठ्यातही मोठे अडथळे निर्माण होऊन जागतिक संकट अधिक गहिरे होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे.