Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:45 IST2025-10-16T18:44:54+5:302025-10-16T18:45:30+5:30
Kapil Sharma Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार होण्याची चार महिन्यांतील तिसरी घटना आहे.

Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
Kapil Sharma Cafe Firing : कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कॅनडातील सरे शहरात असलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर हा गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी ढिल्लों आणि कुलवीर सिद्धू यांनी घेतली असून, या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Once again incident of Firing Happened at KAP'S CAFE. This is the third time firing took place at the Kapil Sharma cafe in Canada. pic.twitter.com/KoOYYBFNof
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) October 16, 2025
हल्लेखोरांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह...आज ‘Kaps Caffe’ वर गोळीबार केला. याची जबाबदारी मी कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लों घेत आहोत. आमचे सामान्य लोकांशी काहीही वैर नाही. आमचा वाद ज्यांच्याशी आहे, त्यांनी दूर राहावे. जे बेकायदेशीर काम करतात, लोकांकडून काम करुन घेऊन पैसे देत नाहीत, बॉलिवूडमध्ये धर्माच्या विरोधात बोलतात, त्यांनी आता तयार राहावे. गोळी कुठूनही येईल.”
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कॅफेच्या बाहेरील काच फुटल्या असून भिंतींवर गोळ्यांचे खुणा दिस आहेत. विशेष म्हणजे, कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार होण्याची चार महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी १० जुलै आणि ७ ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. दोन्ही घटनांनंतर कॅफे काही दिवस बंद ठेवावा लागला होता. आता पुन्हा हल्ला झाल्याने कपिलच्या सुरक्षेबद्दल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीने यापूर्वी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला अनेकदा धमकी दिली आहे. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातही या टोळीची प्रमुख भूमिका होती. गोल्डी ढिल्लों हा टोळीचा यूएस-कॅनडा ऑपरेटिव्ह असल्याचे सांगितले जाते. सरे पोलिस सर्व्हिस (एसपीएस) ने घटनेची पुष्टी केली आहे आणि कुलवीर सिद्धू नावाच्या फेसबुक अकाउंटवरून केलेल्या पोस्टची सत्यता तपासत आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) देखील तपासात सहभागी झाले आहे.