जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:57 IST2023-08-31T14:56:21+5:302023-08-31T14:57:07+5:30
South Africa: अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर येताना दिसत आहे.

जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीत आगीचं तांडव; 63 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत 63 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या व्यापारी भागात गुरुवारी सकाळी ही आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाने आतापर्यंत 63 मृतदेह बाहेर काढले आहेत.
जोहान्सबर्ग इमरजन्सी मॅनेजमेन्ट सर्व्हिसेसचे प्रवक्ते रॉबर्ट मुलाउद्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमनदलाचे जवान मदत आणि बचाव कार्याला लागले आहेत. या घटनेत एका मुलाचाही मृत्यू झाला आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयां दाखल करण्यात आले आहे. तसेच, ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीचा वापर घर नसलेल्यांसाठी अनधिकृत निवास म्हणून केला जात होता. तसेच, या इमारतीसाठी कसल्याही प्रकारचा अधिकृत भाडे करारही झालेला नव्हता. याच बरोबर, एवडे लोक इमारतीत एकत्रित पणे असल्याने मदत आणि बचाव कर्यातही समस्या येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारतीत 200 हून अधिक लोक असण्याची शक्यता आहे. या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप कळू शकलेले नाहीत. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर येताना दिसत आहे.