विश्वास संपला...! अमेरिकेतून स्वतःचे हजारो टन सोने परत मागवण्याची देशांमध्ये चढाओढ; अमेरिकेची दादागिरी धोक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:47 IST2026-04-02T11:46:33+5:302026-04-02T11:47:39+5:30
Europe Gold Reserves News: Donald Trump यांच्या धोरणांमुळे युरोपीय देशांमध्ये तणाव! न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हमधून सोन्याचे साठे मायदेशी नेण्याची का लागली आहे घाई? जाणून घ्या यामागचे नेमके आर्थिक गणित.

विश्वास संपला...! अमेरिकेतून स्वतःचे हजारो टन सोने परत मागवण्याची देशांमध्ये चढाओढ; अमेरिकेची दादागिरी धोक्यात...
जागतिक राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक पुनरागमनानंतर युरोपातील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचे सर्वात मोठे पडसाद आर्थिक क्षेत्रात उमटताना दिसत असून, युरोपातील देश न्यूयॉर्कच्या 'फेडरल रिझर्व्ह'मध्ये ठेवलेले आपले सोन्याचे साठे परत मायदेशी नेण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांच्या संभाव्य व्यापार धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे.
दशकांपासून युरोपातील अनेक देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले सोन्याचे साठे अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवले आहेत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे युरोप आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेने आर्थिक निर्बंध किंवा व्यापार युद्ध छेडले, तर आपले सोन्याचे साठे गोठवले जाऊ शकतात किंवा त्याचा वापर दबावासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती युरोपीय देशांना वाटत आहे.
कोणते देश आहेत आघाडीवर?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलंड, हंगेरी आणि इतर काही मध्य युरोपीय देशांनी त्यांचे सोन्याचे साठे परत नेण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. जर्मनीसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने यापूर्वीच आपले अर्धे सोने न्यूयॉर्कमधून फ्रँकफर्टला हलवले आहे. आता उर्वरित साठ्याबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोन्याचे साठे का महत्त्वाचे?
कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य आणि आर्थिक स्थैर्य हे त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून असते. युद्ध किंवा जागतिक आर्थिक मंदीच्या काळात सोनं हे सर्वात सुरक्षित साधन मानलं जातं. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियाचे परकीय चलन साठे गोठवले होते, त्यातून धडा घेत आता युरोपातील देश स्वतःच्या संपत्तीवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण ठेवू इच्छितात.
जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
जर मोठ्या प्रमाणावर सोने अमेरिकेतून बाहेर काढले गेले, तर डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला धक्का बसू शकतो. तसेच, यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.