एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:20 IST2025-06-07T13:19:47+5:302025-06-07T13:20:35+5:30
ड्रॅगन कॅप्सूलची सेवा बंद करण्याची दिली होती धमकी

एलॉन मस्क-डोनाल्ड ट्रम्प यांचे ब्रेकअप; धमक्या अन् ‘यू टर्न’ सुरू, अमेरिकेचे राजकारण रंगात
वॉशिंग्टन: टेस्ला व स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या कंपन्यांशी असलेल्या करारांत कपात करण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यावर अंतराळवीरांची, तसेच इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’ची सेवाच बंद करण्याची धमकी मस्क यांनी सोशल मीडियावर दिली. परंतु यावर यूजर्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला. एका यूजरने ‘हे अत्यंत लज्जास्पद’ असल्याची पोस्ट केली. याला उत्तर देताना मस्क यांनी ‘यू-टर्न’ घेत आपण हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
‘नासा’चा कणा
अमेरिकी सरकारच्या बोईंग कंपनीचे स्टारलायनर यान अपयशी ठरल्यानंतर भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सला ड्रॅगन कॅप्सूलनेच पृथ्वीवर सुरक्षित परत आणले होते. ‘नासा’च्या अवकाश मोहिमांत मस्क यांची ड्रॅगन कॅप्सूल म्हणजे एक कणा ठरली होती. शिवाय ‘नासा’ने अनेक लष्करी मोहिमांतही स्पेसएक्सची मदत घेतली आहे.
ड्रॅगन कॅप्सूलचे महत्त्व
अंतराळ स्थानकावरून साहित्य-अंतराळवीरांची ने-आण करण्यात सक्षम असलेली स्पेसएक्स ही एकमेव अमेरिकी कंपनी आहे.
अवकाश स्थानकावरील प्रयोग व अभ्यास सुरळीत चालावा यासाठी अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’ बहुतांशपणे स्पेसएक्सवर विसंबून आहे.
सेक्स स्कँडलमध्ये ट्रम्प?
मस्क यांनी एक खळबळजनक दावा केला की डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीनच्या फायलींमध्ये आहे. मस्क यांनी म्हटले की, आता मोठा खुलासा करण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांचे नाव एपस्टीन सेक्स स्कँडल फायलींमध्ये आहे. त्यामुळेच या फाईल सार्वजनिक करण्यात आल्या नाहीत. ट्रम्प, तुमचा दिवस चांगला जावो. त्यांनी पुढे म्हटले आहे, भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईल.
हा झाला असता परिणाम
- अंतराळवीर, साहित्याची ने-आण खोळंबली असती
- नासासाठी रशियाचे यान हाच होता एकमेव पर्याय
काय होता वाद?
ट्रम्प यांनी स्पेसएक्स आणि इंटरनेट उपग्रह सेवा देणाऱ्या स्टारलिंक या इलॉन मस्क यांच्या कंपन्यांच्या अब्जावधी डॉलरच्या करारांत कपात करण्याची धमकी दिली होती. यामुळे मस्क यांनी ड्रॅगन कॅप्सूलची सेवा हळूहळू बंद करण्याचा इशारा दिला होता.
...तर रशियावर होती भिस्त
स्पेसएक्सने अंग काढून घेतले तर ‘नासा’ला मोहिमांसाठी रशियाची सोयूझ कॅप्सूल हाच एकमेव पर्याय होता.