अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 02:44 IST2025-11-28T02:43:53+5:302025-11-28T02:44:44+5:30
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.

अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित
अमेरिकेतील अलास्का राज्याला गुरुवार भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनुसार (USGS), गुरुवारी ०५.११ वाजता GMT नुसार, अलास्कातील सुसिटना (Susitna) भागाच्या १४ किलोमीटर पश्चिमेस ६.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. USGS नुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून ८०.४ किमी खोलीवर होते. याचे सुरुवातीचे लोकेशन ६१.५७ डिग्री उत्तर अक्षांश आणि १५०.७८ डिग्री पश्चिमी देशांतर निश्चित करण्यात आले आहे.
इंडोनेशियात ६.२ तीव्रतेचा भूकंप -
दरम्यान, इंडोनेशियात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.२ एवढी मोजण्यात आली. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.
चीनची वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील उत्तर सुमात्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुरुवारी ६.२ तीव्रतेचा भूकंप आला. याची खोली १० किलोमीटर मोजली गेली.
पूर आणि भूस्खलनात २९ ठार
दुसरीकडे, सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या उत्तरी सुमात्रा प्रांतात अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा वाढून २९ वर पोहोचला आहे.
४०० हून अधिक घरे, अनेक पूल उद्ध्वस्त -
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मंडेलिंग नटाल, साउथ तपनौली आणि नॉर्थ तपनौली या भागांमध्ये तातडीने आणीबाणी (इमर्जन्सी) घोषित करण्यात आली आहे.