अरुणाचल, अक्साई-चीन भारतात दाखवल्यानं ड्रॅगन संतापला, बांगलादेश स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 01:00 IST2025-02-10T00:58:33+5:302025-02-10T01:00:30+5:30
खरे तर हे दोन्ही भाग भारताचेच आहेत. मात्र, चीन या भू-भागांवरून नेहमीच काहीना काही कुरापती करत असतो...

अरुणाचल, अक्साई-चीन भारतात दाखवल्यानं ड्रॅगन संतापला, बांगलादेश स्पष्टच बोलला
बांगलादेशातील दोन पुस्तके आणि डिपार्टमेंट ऑफ सर्व्हेच्या वेबसाइटवर छापण्यात आलेल्या आशिया खंडाच्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवल्याने चीनला मिरची लागली आहे. त्याने यावर आक्षेप घेतला. खरे तर हे दोन्ही भाग भारताचेच आहेत. मात्र, चीन या भू-भागांवरून नेहमीच काहीना काही कुरापती करत असतो. मात्र, यासंदर्भात बांगलादेशनेही चीनला स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. तसेच, यात कुठलाही बदल केला जाणार नाही, यासंदर्भात दबाव टाकू नये, असे म्हटले आहे.
याशिवाय, संबंधित पुस्तकांमध्ये आणि वेबसाइटवरील मॅपमध्ये हाँगकाँग आणि तैवान यांनाही स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले आहे. यामुळे चीनने चिंता व्यक्त केली आहे. ड्रॅगन हे दोन्ही देश आपले असल्याचे म्हणत आहे. बांगलादेशच्या 'प्रोथोमालो' या न्यूज वेबसाइटने दावा केला आहे की, राजनैतिक सूत्रांनी रिपोर्टरला सांगितले आहे की, चीनने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बांगलादेशला एक पत्र पाठवले होते, त्यात पुस्तके आणि सर्वेक्षण विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामध्ये आणि माहितीमध्ये सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये यावर चर्चा झाली होती. मात्र, बांगलादेशच्या विनंतीनंतर, सध्यातरी चीनने या मुद्द्यावर दबाव टाकलेला नाही.
बांगलादेशने दिलं असं उत्तर -
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनने आक्षेप नोंदवल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाशी (एनसीटीबी) संपर्क साधला. यानंतर, एनसीटीबीने मंत्रालयाला सांगितले की, नवीन पुस्तकांची छपाई पूर्ण झाली आहे. आता त्यात कोणतेही बदल करता येऊ शकत नाही. यानंतर, बांगलादेशने परिस्थिती समजाऊन सांगत चीनला उत्तर दिले. तसेच, कोणताही दबाव टाकू नये, असे म्हटले आहे. बांगलादेशी पुस्तके आणि वेबसाइट्समध्ये यापूर्वीही अशाच पद्धतीने नकाशे छापण्यात आले आहेत.
याशिवाय, बांगलादेशातील तज्ज्ञांच्या मते, सध्या दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंध ताणलेले असल्याने चीनने हा मुद्दा उपस्थित केला आहे.
बांगलादेशच्या इब्तेदाई मदरशात, बांगलादेश आणि जागतिक अभ्यास नावाच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आशियाचा नकाशा आहे. यात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन भारताचा भूभाग म्हणून दाखवण्यात आला आहे. तसेच, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बांगलादेश आणि जागतिक अभ्यास पुस्तकात बांगलादेशच्या निर्यात स्थळांची यादी आहे. त्यात हाँगकाँग आणि तैवान स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले आहेत.