पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका, युद्धात मध्यस्थीसाठी भारत सहभागी होऊ शकतो; इराणनं दाखवला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:29 IST2026-03-30T18:28:54+5:302026-03-30T18:29:29+5:30
संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही

पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका, युद्धात मध्यस्थीसाठी भारत सहभागी होऊ शकतो; इराणनं दाखवला विश्वास
तेहरान - इराण युद्धात पाकिस्तान स्वत:ला मध्यस्थ देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यात त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला पाठवलेले अमेरिकेच्या १५ अटींचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला. त्यानंतर पाकिस्तान निवडक इस्लामी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेऊन पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करू लागला. परंतु आता इराणच्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वेगळी माहिती समोर आली आहे. इराणला भारताला मित्र राष्ट्र सांगत अमेरिकेसोबत चर्चेसाठी भरवसा असणारा देश म्हणून भारताचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे इराणच्या सरकारी सूत्रांनी प्रश्न उभे केलेत.
रिपोर्टनुसार, भारत हा इराणचा मित्र आहे. त्यामुळे भारत चर्चेत सहभागी होऊ शकतो. अमेरिकेसोबत मध्यस्थी करताना पाकिस्तानच्या भूमिकेवर इराणने शंका व्यक्त केली. पाकिस्तान कुठल्याही निकालाचे श्रेय घेऊ इच्छितो. आम्ही वाटाघाटी सुरू केल्याचे सर्व दावे फेटाळून लावतो किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केलेले दावे ज्यात आम्ही त्यांच्या १५-कलमी शांतता प्रस्तावाला सहमत आहोत हेही नाकारतो. संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही असंही इराणच्या सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. CNN-News 18 ने हा रिपोर्ट प्रसारित केला आहे.
इस्लामिक देशांना एकत्रित करून पाकिस्तान करतंय वातावरण निर्मिती
जेव्हा पाकिस्तान जगातील सर्वात शक्तिशाली मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना एकत्र करून स्वतःला शांततेचा दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी हा रिपोर्ट आला आहे. केवळ एक दिवस आधी पाकिस्तानने अमेरिका-इराण चर्चेसाठी इस्लामाबादला एक ठिकाण म्हणून प्रस्तावित केले. सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा प्रस्ताव आला, ज्यामध्ये संघर्ष तात्काळ संपवण्यावर भर देण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये झालेल्या तीन देशांच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी आखाती संकटावर संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव खरा उपाय आहे असा पुनरुच्चार केला. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार चार देशांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव आणि संघर्ष तात्काळ संपवण्याचे आवाहन केले. या बैठकीत चार देशांनी मुस्लिम ऐक्यावर भर दिला आणि अमेरिका व इराण यांच्यातील चर्चेला पाठिंबा दिला.
भारतावर दाखवला विश्वास
भारत आणि इराण यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांमधील हे संबंध १९५० च्या दशकापासून सुरू झाले होते. एकेकाळी भारत हा इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक होता परंतु भूराजकीय परिस्थितीमुळे त्यात घसरण झाली. तरीही भारताने इराणसोबत संबंध कायम ठेवले. भारत आणि इराण यांच्यात चाबहार बंदराबाबत मोठा करार झाला आहे. याशिवाय भारताला युरोपशी जोडणाऱ्या अनेक आर्थिक कॉरिडॉरमध्ये इराणचाही समावेश आहे.