डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 00:09 IST2025-06-17T21:00:05+5:302025-06-18T00:09:07+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.
ट्रम्प यांच्या 'त्या' पोस्टमुळे उडाली घबराट
या पळापळीचे मोठे कारण ट्रम्प यांनी त्यांच्या 'टुथ सोशल' (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली एक पोस्ट आहे. ट्रम्प यांनी लिहिले होते की, "प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!" त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, "इराणने मी सांगितलेली 'डील' मान्य करायला पाहिजे होती. किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि किती मानवी नुकसान झाले आहे. मी वारंवार सांगितले आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळू शकत नाहीत."
धमकीमुळे कुटुंबे शहर सोडून पळू लागली!
ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अनेक लोकांनी दावा केला की, त्यांची कुटुंबे राजधानी सोडून जात आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "माझ्या आईने सांगितले की ते सगळे तेहरान सोडत आहेत. सर्व लोक रस्त्यावर पळत आहेत. रस्त्यांवर इतकी गर्दी आहे की, गाड्या हलूही शकत नाहीत."
🔴 RIGHT NOW:
— 𝗡𝗶𝗼𝗵 𝗕𝗲𝗿𝗴 ♛ ✡︎ (@NiohBerg) June 16, 2025
Mass exodus in Tehran. Everyone is desperate to get out after Trump's evacuation order. That's 16 million people.
Pray for our Iran. pic.twitter.com/X16l8yAqPs
दरम्यान, इस्रायलने गेल्या शुक्रवारी (१० जून) इराणवर अचानक हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांचा उद्देश इराणची अणुबॉम्ब ठिकाणे, वैज्ञानिक आणि लष्करी नेतृत्व यांना लक्ष्य करणे होता. इस्रायलचा दावा आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत.
तेहरानची लोकसंख्या इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी!
या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर इराणमध्ये २२४ हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. सध्या तेहरानमध्ये सुमारे १ कोटी लोक राहतात, जी इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की, लोक खाण्यापिण्याचे सामान घेऊन पळत आहेत आणि शहर सोडण्याची स्पर्धाच लागली आहे.