Donald Trump: रशिया-युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ, ट्रम्प यांचा दावा; मॉस्को-कीवकडे विशेष दूत रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:21 IST2025-11-26T09:16:50+5:302025-11-26T09:21:51+5:30
Russia Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

Donald Trump: रशिया-युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ, ट्रम्प यांचा दावा; मॉस्को-कीवकडे विशेष दूत रवाना!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असून, लवकरच दोन्ही देशांमध्ये अंतिम शांतता करार होईल, असा त्यांनी दावा केला आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील तणाव मिटवण्यासाठी मॉस्को आणि कीव येथे त्यांचे विशेष दूत पाठवले आहे.
व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "मी नऊ महिन्यांत आठ युद्धे संपवली आहेत आणि आम्ही शेवटच्या युद्धावर काम करत आहोत. ते सोपे नव्हते. गेल्या महिन्यात २५,००० युक्रेनियन आणि रशियन सैनिक मारले गेले आहेत आणि मला वाटते की, आम्ही एका कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत."
ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांची टीम शांतता टिकवण्यासाठी योजना राबवत आहे. या योजनेचा आराखडा रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींच्या माहितीनुसार सुधारित करण्यात आला आहे आणि आता त्यात फक्त काही मुद्दे मतभेदाचे राहिले आहेत. ट्रम्प यांनी त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्यासाठी मॉस्कोला जाण्याचे निर्देश दिले आहेत. यूएस आर्मी सेक्रेटरी डॅन ड्रिस्कॉल शांतता कराराच्या उर्वरित अटींवर काम करण्यासाठी युक्रेनियन अधिकाऱ्यांशी भेटणार आहेत.
ट्रम्प यांनी यापूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते स्वतः राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटण्यास उत्सुक आहेत. परंतु, ही भेट केवळ युद्ध संपवण्याचा करार अंतिम टप्प्यात असेल तेव्हाच होईल.