डोनाल्ड ट्रम्प यांचे हात इराणी रक्ताने माखलेले; खामेनेई यांची अमेरिकेवर टीका, हिंसक आंदोलन पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:19 IST2026-01-10T10:18:42+5:302026-01-10T10:19:52+5:30
ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे हात इराणी रक्ताने माखलेले; खामेनेई यांची अमेरिकेवर टीका, हिंसक आंदोलन पेटले
दुबई : इराणमधील हिंसक आंदोलनांनी आता गंभीर वळण घेतले असून, देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आंदोलकांविरुद्ध कठोर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी आंदोलक स्वतःच्याच देशाच्या मालमत्तेचे नुकसान करत आहेत, असा आरोप खामेनेई यांनी शुक्रवारी केला. दरम्यान, इराण सरकारने संपूर्ण देशातील इंटरनेट आणि टेलिफोन सेवा खंडित केल्याने परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.
खामेनेईंची आक्रमक भूमिका
सरकारी टीव्हीवरून देशाला संबोधित करताना ८६ वर्षीय खामेनेई यांनी ट्रम्प यांचा उल्लेख इराणी लोकांच्या रक्ताने माखलेले हात असलेला व्यक्ती असा केला. ट्रम्प यांनी आंदोलकांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे इराणच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे, इराणच्या रस्त्यांवर सरकारी समर्थकांनी ‘अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देत निदर्शने केली.
इंटरनेटचा ‘ब्लॅकआउट’
जगाला इराणमधील खरी परिस्थिती कळू नये आणि आंदोलकांमध्ये समन्वय राहू नये, यासाठी सरकारने इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प केली आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना माहिती मिळविण्यात अडचणी येत आहेत. इंटरनेट बंद झाल्याचा फायदा घेऊन सुरक्षा दले आंदोलकांचे दमन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांचा इशारा
जर इराणने आंदोलकांवर गोळीबार केला किंवा त्यांना मारले, तर अमेरिका शांत बसणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.