डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा' योजनेला पीएम मोदींचा पाठिंबा; अमेरिकेने म्हटले 'गेमचेंजर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:43 IST2025-10-03T11:43:20+5:302025-10-03T11:43:20+5:30
Donald Trump Gaza Plan: गाझामध्ये शांतता प्रस्थापनेसाठी ट्रम्प यांच्या योजनेला जागतिक समर्थन मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गाझा' योजनेला पीएम मोदींचा पाठिंबा; अमेरिकेने म्हटले 'गेमचेंजर'
Donald Trump Gaza Plan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये शांतता प्रस्थापनेसाठी मांडलेल्या योजनेला जागतिक पातळीवर व्यापक समर्थन मिळत असून, व्हाईट हाऊसने या योजनेला दूरदर्शी व 'गेम चेंजर' म्हटले आहे. अरब देशांपासून ते पाश्चात्य राष्ट्रांपर्यंतचे नेते या योजनेला पाठिंबा देत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाईट हाऊसकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ट्रम्प यांच्या योजनेमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनाशकारी संघर्षाला एक निर्णायक वळण मिळू शकते. या योजनेत तात्काळ युद्धविराम, सर्व बंधकांची सुरक्षित सुटका आणि सतत मानवी मदतीवर विशेष भर देण्यात आला आहे. अंतिम उद्दिष्ट गाझाला समृद्धी व स्थायी शांततेचे प्रतीक बनवणे आहे.
अमेरिकी प्रशासनाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून या उपक्रमाचे स्वागत करताना लिहिले होते की, "ही घोषणा पॅलेस्टाईन व इस्रायलच्या लोकांसाठी स्थायी शांतता, सुरक्षा व विकासाचा व्यवहार्य मार्ग दाखवते. सर्व संबंधित पक्ष या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे."
या देशांचाही पाठिंबा
विशेष म्हणजे, सौदी अरेबिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, कतार आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही संयुक्त निवेदनाद्वारे या योजनेला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाचे मत आहे की, हा उपक्रम केवळ प्रादेशिक स्थैर्य वाढवणार नाही, तर जागतिक पातळीवरही सुरक्षा व स्थिरतेला बळकटी देईल. गाझा संघर्ष निराकरणासाठी ही योजना सकारात्मक संकेत देत असून सर्व पक्ष या उपक्रमात सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.