एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:23 IST2025-09-10T13:23:01+5:302025-09-10T13:23:41+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध, विशेषतः भारत आणि चीनविरुद्ध कठोर आर्थिक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
India America Tarriff war, donald trump pm modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाविरुद्ध आपली भूमिका कठोर केली आहे. यावेळी त्यांचे लक्ष्य थेट त्या देशांवर आहे, जे रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना एकाअर्थाने आर्थिक बळ देत आहेत. यात भारत आणि चीन हे दोन बडे देश आघाडीवर आहेत. ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे, की जर पुतिन यांच्यावर खरोखर दबाव आणायचा असेल, तर भारत आणि चीनसारख्या देशांवर १००% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले पाहिजे. या संपूर्ण कारवाईचा उद्देश तेल व्यवसायातून रशियाला मिळणारे उत्पन्न कमकुवत करणे हा आहे. ट्रम्पचा असा विश्वास आहे की जोपर्यंत भारत आणि चीन रशियन कच्चे तेल खरेदी करत राहतील, तोपर्यंत युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक धक्का देणे कठीण आहे.
EU अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, पुतिना यांच्याबद्दलचे विधान ट्रम्प यांनी EU चे निर्बंध दूत डेव्हिड ओ'सुलिवान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान केले. अमेरिकन प्रशासनाने असेही संकेत दिले आहेत की जर युरोपियन युनियनने भारत आणि चीनवर कर वाढवले, तर अमेरिकादेखील या रणनीतीमध्ये त्यांच्यासोबत उभे राहील. युरोपियन युनियनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे म्हणणे आहे की जर EU कारवाई केली, तर आम्हीही पाठिंबा देऊ.
ट्रम्प यांनी यापूर्वीही दिली आहे कर वाढवण्याची धमकी
ट्रम्प यांनी यापूर्वीही भारत आणि चीनविरोधाक कठोर भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे. अलिकडेच अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले. विशेषतः रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे, भारतातील काही उत्पादनांवर अतिरिक्त २५% कर लादण्यात आला, ज्यामुळे एकूण कर ५०% पर्यंत पोहोचला आहे. तसेच आता अमेरिका १००% कर लावण्याची भाषा करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांची नेमकी रणनीति काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
एकीकडे मैत्रीची चर्चा, दुसरीकडे कररूपी हल्ला
एकीकडे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी, मोदी आणि ते कायम चांगले मित्र राहतील असेही म्हटले होते. असे असताना, दुसरीकडे ट्रम्प भारतावर कठोर आर्थिक पावले उचलण्याबद्दल बोलत आहेत. म्हणजेच ट्रम्प भारतासोबतचे संबंध पूर्णपणे बिघडू नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत, पण रशियापासून भारताला दूर ठेवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.