"कतार समजू नका, नाही तर..."; पाकिस्तानचा इस्त्रायलला थेट इशारा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:09 IST2026-03-27T13:09:29+5:302026-03-27T13:09:52+5:30
महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यात पाकिस्तानी दूतावास अथवा तेथील कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही....

"कतार समजू नका, नाही तर..."; पाकिस्तानचा इस्त्रायलला थेट इशारा, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या एक महिन्यापासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच आता पाकिस्तानने इस्त्रायलला थेट इशारा दिला आहे. इस्त्रायली सैन्याने (IDF) शुक्रवारी मध्य तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या हल्ल्यांचा परिणाम तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाच्या जवळ असलेल्या इमारतींवरही झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारशी संबंधित 'पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरम'ने संताप व्यक्त केला आहे. तसेच, "पाकिस्तान म्हणजे कतार नाही, हे इस्त्रायलने लक्षात ठेवावे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना इजा पोहोचली, तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल." असेही त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यात पाकिस्तानी दूतावास अथवा तेथील कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या मध्यभागी असलेल्या इराणी दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. दुसरीकडे, इराणने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' चा ८३ वा मारा सुरू केला. हायफा येथील इस्त्रायली इंधन आणि नौदल तळांना ड्रोनद्वारे लक्ष्य केले. दरम्यान इराणने भारत, पाकिस्तान, जर्मनी आणि स्पेनच्या जनतेने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
पाकिस्तानची मध्यस्थी अन्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय -
या भीषण संघर्षात पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले, अमेरिका आणि इराणमधील अप्रत्यक्ष चर्चा पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू आहे. अमेरिकेने दिलेला १५ कलमी प्रस्ताव सध्या इराणच्या विचाराधीन आहे. त्यावर इराण विचार करत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विनंतीवरून ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, ६ एप्रिलपर्यंत हे हल्ले थांबवले आहेत.