शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:38 IST2025-11-25T15:38:13+5:302025-11-25T15:38:55+5:30
Saturn Ring : २३ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री जगभरातील खगोलप्रेमींना शनिचे कडे अचानक गायब झाल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.

शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
नवी दिल्ली: सूर्यमालेतील सर्वात सुंदर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनि, ज्याला त्याच्या भव्य कड्यांमुळे 'ग्रहमालेचा राजा' म्हटले जाते, तो एका अभूतपूर्व बदलातून जात आहे. २३ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री जगभरातील खगोलप्रेमींना शनिचे कडे अचानक गायब झाल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.
या घटनेने अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी, नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी यावर लगेचच स्पष्टीकरण दिले आहे. शनि ग्रहावर कोणताही मोठा किंवा विनाशकारी बदल झालेला नाही. ही पूर्णपणे एक दृष्टीभ्रम आहे, जी एका दुर्मीळ खगोलीय घटनेमुळे घडते.
या घटनेला 'रिंग प्लेन क्रॉसिंग' किंवा शनिचा विषुववृत्त म्हणतात. जेव्हा पृथ्वी शनिच्या कड्यांच्या बरोबर पातळीतून प्रवास करते, तेव्हा हे कडे पृथ्वीवरून दिसेनासे होतात.
अदृश्य होण्याचे कारण
शनिचे कडे आडवे पसरलेले असले तरी, त्यांची जाडी केवळ काही मीटर इतकी नगण्य आहे. जेव्हा आपण त्यांना बाजूने पाहतो, तेव्हा ते प्रकाशाचे परावर्तन फार कमी करतात आणि अत्यंत पातळ रेषा किंवा अदृश्य झालेले दिसतात.
किती वर्षांनी घडते
शनि सूर्याभोवती सुमारे २९.४ वर्षांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. या प्रदक्षिणेदरम्यान, हे कडे दर १३ ते १५ वर्षांनी एकदा पृथ्वीवरून 'अदृश्य' झालेले दिसतात. नोव्हेंबर २०२५ मधील हे दुसरे रिंग प्लेन क्रॉसिंग होते. यापूर्वी मार्च २०२५ मध्येही हे कडे अदृश्य झाले होते, परंतु त्यावेळी शनि सूर्यप्रकाशात असल्यामुळे ही घटना स्पष्टपणे पाहता आली नव्हती. लवकरच हे कडे हळूहळू पुन्हा दिसायला लागतील आणि २०३० च्या सुरुवातीस ते त्यांच्या पूर्वीच्या पूर्ण प्रकाशात दिसतील.