अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:43 IST2026-01-14T19:43:14+5:302026-01-14T19:43:42+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर टॅरिफ विरोधात निर्णय आला तर अमेरिका बरबाद होईल असं म्हटले.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
वॉश्गिंटन - भारतासह अमेरिकेसाठी आज खास दिवस आहे. कारण अमेरिकन सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर मोठा निर्णय येऊ शकतो. जगातील सर्व शेअर बाजार या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. जर हा निर्णय ट्रम्प यांच्या बाजूने लागला तर शेअर बाजारात त्याचे पडसाद आणखी दिसू शकतात परंतु जर ट्रम्प यांच्या बाजूने निर्णय आला नाही तर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर टॅरिफ विरोधात निर्णय आला तर अमेरिका बरबाद होईल असं म्हटले. मात्र ट्रम्प यांच्या बाजूने निकाल आला तर जगात खळबळ माजू शकते. विशेषत: शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसू शकतो असं तज्ज्ञांनी संकेत वर्तवले आहेत. ट्रम्प टॅरिफवर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे असे अधिकार आहेत का की ते कुठल्याही देशावर मनमानीपणे टॅरिफ लावू शकतात यावर सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहे. ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमरजन्सी इकोनॉमी एक्ट नावाने कायदा करून भारतासह अनेक देशांवर उच्च टॅरिफ लावला आहे.
मात्र अनेक राज्ये आणि उत्पादक कंपन्यांनी राष्ट्रपतींकडे अशाप्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार कायद्यात आहे का असा प्रश्न केला आहे. त्या सर्वांनी ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावरच सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९ नंतर यावर निर्णय येऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाने अमेरिकेने लावलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले तर अमेरिकेला अब्जावधी डॉलर टॅक्स कंपन्यांना परत करावा लागू शकतो. त्याशिवाय राष्ट्रपती ट्रम्प यांच्याकडील टॅरिफ लावण्याचे अधिकारही कमी होऊ शकतात. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात हा निकाल गेला तर अमेरिकेला दुसऱ्या देशांकडून वसुल केलेले २५० अब्ज डॉलर परत करावे लागतील. त्याशिवाय नवीन ५०० टक्के टॅरिफ विधेयकही रद्द होऊ शकते.
दरम्यान, अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर भारत आणि चीन शेअर बाजारात परिणाम दिसून येऊ शकतो. त्याशिवाय अमेरिकेत भारत, चीन यांची निर्यातही वाढेल. या निकालामुळे व्यापारातही वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सट्टा बाजारात सुप्रीम कोर्टाचा निर्णय ट्रम्प यांच्याविरोधात लागू शकतो असं म्हटलं आहे. त्यामागे काही तर्कही दिले जात आहेत. संविधानानुसार टॅरिफ लावण्याचा मूळ अधिकार काँग्रेसकडे आहे. तो फक्त राष्ट्रपतींकडे नाही. ज्या कायद्याचा वापर करून ट्रम्प हे टॅरिफ लावत आहेत त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला नाही असा त्यांचा तर्क आहे.