इस्रायलवर मालिका बनवणाऱ्या 'एमी' विजेत्या डाना ईडन यांचा मृत्यू; शरीरावर जखमेच्या खुणांमुळे गूढ वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:24 IST2026-02-17T15:19:15+5:302026-02-17T15:24:49+5:30
'तेहरान' सीरिजच्या निर्मात्या डाना ईडन यांचा ग्रीसची राजधानी एथेंस येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.

इस्रायलवर मालिका बनवणाऱ्या 'एमी' विजेत्या डाना ईडन यांचा मृत्यू; शरीरावर जखमेच्या खुणांमुळे गूढ वाढले!
जगभरात गाजलेल्या आणि आंतरराष्ट्रीय 'एमी' पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या 'तेहरान' या जासूसी वेब सीरिजच्या निर्मात्या डाना ईडन यांचा ग्रीसची राजधानी एथेंस येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. डाना ईडन या 'तेहरान'च्या चौथ्या सीझनच्या शूटिंगसाठी ग्रीसमध्ये होत्या. सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळल्याने खळबळ माजली आहे. ग्रीक पोलिसांनी प्राथमिक तपासात ही संशयास्पद आत्महत्या असल्याचे म्हटले असले तरी, घटनास्थळावरील काही खुणांनी तपासाची सुई वेगळ्या दिशेने वळवली आहे.
हॉटेलच्या खोलीत नेमकं काय आढळलं?
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डाना ईडन यांचा मृतदेह त्यांच्या हॉटेल रूममध्ये अत्यंत विदारक अवस्थेत आढळला. त्यांच्या गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या, तसेच शरीराच्या खालच्या भागावरही इजा झाल्याचे दिसून आले आहे. खोलीत काही गोळ्या देखील विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या आहेत. शरीरावरील जखमांमुळे ही केवळ आत्महत्या आहे की यामागे काही हिंसक कट आहे, याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
भावाच्या एका संशयाने फुटले भांडे
डाना यांचा भाऊ त्यांना सतत मेसेज करत होता, मात्र बहिणीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार संपर्क करूनही उत्तर न मिळाल्याने घाबरलेल्या भावाने थेट हॉटेल गाठले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोली उघडली असता, समोर डाना यांचा मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, डाना यांच्या 'डोना अँड शुला प्रॉडक्शन' कंपनीने या मृत्यूमागे कोणताही राजकीय किंवा गुन्हेगारी कट नसल्याचा दावा करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे 'तेहरान' कनेक्शन?
'तेहरान' ही मालिका इजरायली गुप्तचर संघटनाच्या एका महिला एजंटवर आधारित आहे, जी इराणमध्ये घुसखोरी करते. ही मालिका आपल्या थरारक कथानकामुळे जगभरात लोकप्रिय झाली आहे. २०२१ मध्ये या मालिकेने 'इंटरनॅशनल एमी अवॉर्ड' जिंकून इतिहास घडवला होता. नुकताच या मालिकेचा तिसरा सीझन रिलीज झाला असून, चौथ्या सीझनची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
तपासाकडे जगाचे लक्ष
ग्रीक पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्येचा, हे स्पष्ट होईल. मात्र, जासूसी जगावर आधारित मालिका बनवणाऱ्या निर्मात्याचा अशा प्रकारे परदेशात मृत्यू होणे, यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.