खळबळजनक खुलासा! अमेरिकेचा खरा डोळा इराणच्या तेलावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'खास' खासदाराचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 08:32 IST2026-03-09T08:32:26+5:302026-03-09T08:32:59+5:30
Crude Oil Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ! मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर बनल्यानंतर जागतिक बाजारात खळबळ. रशिया-युक्रेन युद्धानंतरचे सर्वोच्च दर.

खळबळजनक खुलासा! अमेरिकेचा खरा डोळा इराणच्या तेलावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'खास' खासदाराचे वक्तव्य
अमेरिका आणि इराणमधीलयुद्ध केवळ सुरक्षेसाठी नसून, त्यामागे एक मोठा आर्थिक आणि व्यावसायिक हेतू दडलेला आहे, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅम यांनी केला आहे. वेनेझुएलाप्रमाणेच अमेरिकेला आता इराणच्या तेल साठ्यांवर ताबा मिळवायचा आहे, असे सूचक विधान त्यांनी केले असून, यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सिनेट रॅम यांच्या मते, इराणवर करण्यात आलेली लष्करी कारवाई ही केवळ अण्वस्त्रे रोखण्यासाठी नाही. अमेरिकेची नजर इराणच्या नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः कच्च्या तेलाच्या अफाट साठ्यांवर आहे. "ज्याप्रमाणे आम्ही वेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून तेथील तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रकार इराणमध्येही होण्याची शक्यता आहे," असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
वेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे आहेत आणि तिथे अमेरिकेने अनेक वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता इराणच्या बाबतीतही अमेरिका 'तेल नियंत्रणाची' तीच रणनीती वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर अमेरिकेने इराणच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवले, तर जागतिक तेल बाजारावर अमेरिकेचे संपूर्ण वर्चस्व निर्माण होईल.
जागतिक परिणाम
जर हे विधान खरे ठरले, तर रशिया आणि चीन यांसारखे देश अमेरिकेच्या या भूमिकेला तीव्र विरोध करू शकतात. दुसरीकडे, भारतासारख्या देशांसाठी, जे इराणकडून तेल खरेदी करण्यास इच्छुक आहेत, हा पेच अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल वाढतेय...
जागतिक तेल बाजारात आज रविवारी ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच मोठा भूकंप झाला आहे. मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणमधील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाने १०० डॉलरचा टप्पा ओलांडला असून, रशिया-युक्रेन युद्धानंतरचे हे सर्वात उच्चांकी दर आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट २० टक्क्यांनी वधारून १०९.१७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. ब्रेंट क्रूड १९ टक्क्यांच्या वाढीसह ११०.३५ डॉलर प्रति बॅरलवर गेले.
भारताच्या खिशावर किती भार पडणार?
तेलाच्या किमतीत झालेली ही १० ते २० टक्क्यांची वाढ भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे.
१. महागाई: डिझेलचे दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महाग होतील.
२. पेट्रोल-डिझेल: लवकरच देशात इंधन दरवाढीचे संकट ओढवू शकते.
३. रुपयाची घसरण: आयातीसाठी अधिक डॉलर्स मोजावे लागल्याने भारतीय रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे.