coronavirus: हा स्प्रे कोरोनाचा कर्दनकाळ ठरणार, नाकात जाताच ९९.९९ टक्के विषाणूंचा खात्मा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 15:29 IST2021-04-14T15:27:51+5:302021-04-14T15:29:51+5:30
coronavirus News : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

coronavirus: हा स्प्रे कोरोनाचा कर्दनकाळ ठरणार, नाकात जाताच ९९.९९ टक्के विषाणूंचा खात्मा करणार
नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने सध्या जगातील अनेक देशांत पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. ( sanotize spray will kill 99.99% of corona virus in the nose)
कॅनडामधील सॅनोटाइझ नावाच्या कंपनीने एक स्प्रे तयार केला आहे. हा स्प्रे नाकात घातल्यावर विषाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होते. तसेच या स्प्रेच्या मदतीने रुग्णावरील उपचारांच्या वेळेमध्येही मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. त्याशिवाय गंभीर लक्षणांचा सामना करत असलेल्या रुग्णांची स्थितीही सुधारू शकते.
द सनच्या रिपोर्टनुसार हा स्प्रे ९९.९९ टक्के विषाणू नष्ट करतो. तसेच हा विषाणूला पसरण्यापासून रोखतो. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या लॅब टेस्टमध्ये सॅनोटाइझचा स्पे विषाणूला वरच्या वायूमार्गातच नष्ट करतो. त्यानंतर त्याला वाढण्यापासून आणि फुप्फुसापर्यंत जाण्यापासून रोखतो, असे दिसून आले. स्प्रेच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या रुग्णांमध्ये पहिल्या २४ तासांत सरासरी व्हायरल रिडक्शन १.३६२ एवढे दिसून आले. आकडेवारी पाहिल्यास या स्प्रेच्या वापरामुळे विषाणूमध्ये ९५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. कर ७२ तासांमध्ये व्हायरल लोड ९९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले.
ब्रिटनमध्ये झालेल्या चाचणीमधील मुख्य संशोधक डॉक्टर स्टीफन विन्चेस्टर सांगतात की, मला अपेक्षा आहे की, कोरोनाच्या साथी विरोधात जागतिक लढाईमध्ये हे संशोधन हा मोठा विजय ठरणार आहे. मला वाटते ही बाब क्रांतिकारी आहे. भारतामध्येसुद्धा अशा प्रकारचे औषध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोव्हॅक्सिन विकसित करणारी भारतीय कंपनी भारत बायोटेक कोरोफ्लू या नावाने एक औषध तयार करत आहे. या औषधाचा वापर सिरींजऐवजी स्प्रेच्या स्वरूपात केला जाईल. हे औषध तयार झाल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारांची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. कारण यामध्ये कमी वेळ लागेल.