CoronaVirus: रात्री टेरेसवर बसताय? १३३४ डॉलर्स भरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 04:00 IST2020-04-22T03:59:53+5:302020-04-22T04:00:04+5:30
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड येथील गोल्ड कोस्ट शहरातल्या तीन तरुणांना जमावबंदीचे नियम मोडण्याच्या आपल्या खुमखुमीचा मोठा दंड सोसावा लागला.

CoronaVirus: रात्री टेरेसवर बसताय? १३३४ डॉलर्स भरा!
ऑस्ट्रेलिया
कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांनी आपापल्या स्तरावर संचारबंदी, जमावबंदीसह अनेक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. हे नियम पाळणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, पण नियम म्हटले की, ते तोडण्याची खुमखुमी आलीच. मग त्याला ऑस्ट्रेलिया देशही अपवाद कसा असेल?
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड येथील गोल्ड कोस्ट शहरातल्या तीन तरुणांना जमावबंदीचे नियम मोडण्याच्या आपल्या खुमखुमीचा मोठा दंड सोसावा लागला.
गेल्या शनिवारच्या रात्री हे तीन तरुण बिल्डिंगच्या गच्चीवर अपेयपान करीत गप्पा मारत बसले होते. एवढ्या रात्रीचं आपल्याला कोण बघणार असे त्यांना वाटले होते, पण पिण्यात आणि गप्पा मारण्यात गुंग असलेल्या या तीन तरुणांची ‘आम्हाला तुम्ही दिसता आहात’ या वाक्यानं भंबेरी उडाली.
हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी या तिघांची ही चोरी पकडली होती. तुमच्या तिघांमधल्या मध्ये बसलेल्या तरुणानं हुडी घातलेली आहे. तुम्ही आताच्या आता खाली जा. पोलिसांच्या या आदेशानं या तिघांना तडकाफडकी खाली जावं लागलं. खाली जाताच त्यांचा स्वागताला पोलीस आणि त्यांच्यासोबतचे कुत्रे हजर होते.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात पोलीस आकाशातूनही नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. आकाशातल्या गस्तीदरम्यानच पोलिसांना हे तीन तरुण आढळले. १९, २० आणि २१ वर्षांचे हे तरुण गोल्ड कोस्ट येथील जेफरसन गल्लीतील पाम बिच या बिल्डिंगच्या गच्चीवर बसलेले होते. कायद्याचं उल्लंघन करून एकत्र जमलेल्या या तरुणांवर पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा दाखल केला आणि प्रत्येकाला १३३४ डॉलरचा दंडही ठोठावला.