Coronavirus: 'ही' ती वेळ नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारताचं सणसणीत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:15 PM2020-04-07T12:15:53+5:302020-04-07T12:17:59+5:30

भारतानं अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादं औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतंही कारण नाही,

Coronavirus: India's answer to Donald Trump's threat about hydroxicloriquin tablet MMG | Coronavirus: 'ही' ती वेळ नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारताचं सणसणीत उत्तर 

Coronavirus: 'ही' ती वेळ नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारताचं सणसणीत उत्तर 

googlenewsNext

 

मुंबई - कोरोना विषाणूनं चीन, युरोपनंतर आता अमेरिकेत धुमाकूळ घातला आहे. त्यावरुन अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची गरज आहे. मात्र, भारतानं या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या धमकीला विदेश मंत्रालयाने सणसणीत उत्तर दिलंय. सर्वप्रथम भारताजवळील गरजवंत देशांना आम्ही हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची पूर्तता करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलं होतं. 

भारतानं अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादं औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतंही कारण नाही, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'हा त्यांचा (पंतप्रधान मोदींचा) निर्णय असल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही. त्यांनी हे औषधं इतर देशांमध्ये पाठवण्यावर निर्बंध लादले आहेत, याची मला कल्पना आहे. मी काल त्यांच्याशी संवाद साधला होता. आमच्यात चांगली चर्चा झाली. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम आहेत,' असं ट्रम्प पुढे म्हणाले.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवण्याबद्दल विचार करू, असं पंतप्रधान मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती त्यांनी दिली. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू, असं ट्रम्प म्हणाले. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीला परवानगी दिली नाही तरीही ठीक आहे. मग आम्ही प्रत्युत्तरादाखल आवश्यक कारवाई करू आणि ती करायलाच हवी ना?, असा प्रश्न उपस्थितांना विचारत ट्रम्प यांनी भारताला अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

आता, भारताने ट्रम्प यांच्या धमकीवजा इशाऱ्याला सणसणीत उत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी असते ती देशातील नागरिकांची, त्यामुळे सर्वप्रथम आपल्या नागरिकांची काळजी घेणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणे गरजेचे आहे. म्हणूनच, काही औषध-गोळ्यांच्या निर्यातीवर बंधन आणण्यात आले होते. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता सरकारने १४ विविध प्रकारच्या औषधांवरील निर्यातबंदी उठवली आहे. सध्या पॅरासिटीमॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मोठी मागणी वाढली आहे. त्यानुसार, भारतात पुरेल एवढा स्टॉक पूर्ण झाल्यानंतर या कंपन्यांशी बोलणी करण्यात येईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. 

तसेच, काही शेजारील देश पॅरोसिटीमॉल आणि हायड्रोक्लोरोक्वीन या औषधांसाठी पूर्णत: भारतावर अवलंबून आहेत. त्यामुळे प्राधान्याने या देशांना ही औषधे देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ज्या देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक आहे, त्याही देशात या औषधांचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे सद्यपरिस्थितीला राजकीय चष्म्यातून कुणीही पाहू नये, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: Coronavirus: India's answer to Donald Trump's threat about hydroxicloriquin tablet MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.