षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:40 IST2025-10-22T16:00:51+5:302025-10-22T17:40:36+5:30
या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात महिलांना जिहादचे ऑनलाइन ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. जैश ए मोहम्मद महिलांकडून फंड जमा करत आहे.

षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
कराची - ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना टार्गेट करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. भारताने जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाला टार्गेट केले होते. आता जैश ए मोहम्मद पुन्हा नव्याने भारताविरोधात षडयंत्र रचत आहे. ५०० रूपयांत मुलींना आणि महिलांना जिहादचे ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. त्यासाठी जैश ए मोहम्मदने नवीन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्सचं नेतृत्व दहशतवादी मसूद अजहरची बहीण आणि उमर फारूकची पत्नी करत आहे. जिहादच्या या कोर्ससाठी प्रत्येक मुलीकडून ५०० रूपये पाकिस्तानी चलन घेतले जाणार आहे.
जैश ए मोहम्मद आता त्यांच्या ब्रिगेडमध्ये ख्वातिना म्हणजे महिलांची नियुक्ती करत आहे. या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात महिलांना जिहादचे ऑनलाइन ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. जैश ए मोहम्मद महिलांकडून फंड जमा करत आहे. या कोर्सला तुफत अल मुमिनात असं नाव देण्यात आले आहे. संयु्क्त राष्ट्राने निर्बंध लावलेल्या जैश ए मोहम्मदने महिलांच्या नियुक्तीसाठी जमात उल मुमिनात गठीत केले आहे. या दहशतवादी संघटनेला मजबूत करण्यासाठी महिला ब्रिगेडमध्ये जास्तीत जास्त भरती करण्यासाठी दहशतवाद्यांनी त्यांच्या घरातील बायकांना पुढे आणले आहे. त्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जैश कमांडरच्या महिला सदस्यांचा समावेश आहे. या महिला जिहाद आणि मजहबचं ट्रेनिंग देणार आहेत.
येत्या ८ नोव्हेंबरपासून हे भरती अभियान सुरू होणार आहे. मसूद अजहरच्या २ बहिणी सादिया अजहर आणि समायरा अजहर दररोज ४० मिनिटे ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांना जैश ए मोहम्मदची महिला ब्रिगेड जमात उल मुमिनातमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. नव्या जमात उल मुमिनातमध्ये मौलाना मसूद अजहरने त्याची कमान छोटी बहीण सादिया अजहरला सोपवली आहे. सादियाचा पती दहशतवादी युसूफ अजहर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेला होता. मसूद अजहरने छोटी बहीण सादिया आणि उमर फारूकची पत्नी अफरीरा फारूकला हे काम दिले आहे. उमर फारूकने पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला होता, त्यावेळी भारतीय सुरक्षा जवानांनी चकमकीत त्याला ठार केले.
दहशतवादी मसूद अजहरने पाकिस्तानात फंड जमा करण्यासाठी जकातचा कार्यक्रम सुरू केला आहे. २७ सप्टेंबरला बहावलपूर येथील मरकज उस्मान अली येथे त्याने जनतेला आवाहन केले होते. आता जैश ए मोहम्मद महिलांना ट्रेनिंग देण्यासाठी कार्यक्रमाला पैसे जमा करत आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून ५०० रूपये घेतले जात आहेत. त्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरला जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मसूद अजहरने जैश ए मोहम्मदची महिला ब्रिगेड जमात उल मुमिनात स्थापन करण्याची घोषणा केली. १९ ऑक्टोबरला पाकव्याप्त काश्मीरात महिलांना या संघटनेत सहभागी होण्यासाठी दुख्तारिन ए इस्लाम नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता.