कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:47 IST2025-06-08T10:23:12+5:302025-06-08T10:47:45+5:30

कोलंबियात राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Columbia presidential candidate Miguel Uribe shot in the head condition critical | कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक

कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक

Colombian Senator Miguel Uribe: दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये, राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या मिगुएल उरीबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. भाषण सुरु असतानाच राष्ट्राध्यक्ष  पदाचे उमेदवार असलेल्या मिगुएल उरीबे यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. उरीबे यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर आली आहे. निवडणुकीची सभा सुरु असताना झालेल्या गोळीबारानंतर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये उरीबे यांच्यावर गोळी झाडल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. बोगोटा येथे निवडणूक सभा घेत असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. स्थानिक माध्यमांनुसार, उरीबे यांच्यावर तीन गोळ्या चावलण्यात आल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. कोलंबियामध्ये २०२६ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. मिगुएल उरीबे हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. ३९ वर्षीय उरीबे हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाने याला हिंसाचाराचे क्रूर कृत्य म्हणत ते अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला फॉन्टीबॉन परिसरातील एका उद्यानात झाला, जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं.

मिगुएल उरीबे जखमी होताच, त्यांचे समर्थक आणि पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले आणि रुग्णालयात दाखल केले. उरीबे यांना रुग्णवाहिकेत ठेवत असताना त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. काही व्हिडीओंमध्ये हा संशयित उरीबे यांच्यासमोर उभा असल्याचे दिसत आहे. तो एका महिलेशी देखील बोलत असल्याचे एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. त्यामुळे संशयिताकडे अन्य लोकांचा यामध्ये सहभाग होता का याबाबतही चौकशी केली जात आहे.

उरीबे हे कोलंबियाचे प्रसिद्ध पत्रकार डायना टर्बे यांचा मुलगा आहे. १९९१ मध्ये ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलने डायनाचे बोगोटा येथे अपहरण केले होते. डायना त्या काळातील एक मोठ्या पत्रकार होत्या. त्या सतत ड्रग्ज तस्करी आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध लिहित होत्या. एका मोहिमेदरम्यान त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
 

Web Title: Columbia presidential candidate Miguel Uribe shot in the head condition critical