कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच; दुबईत सुरू झाले जगातील सर्वात उंच हॉटेल, सर्वात वर स्वीमिंग पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:42 IST2025-11-13T16:41:23+5:302025-11-13T16:42:15+5:30
Ciel Dubai Marina: हे 377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचे अद्भुत मिश्रण आहे.

कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच; दुबईत सुरू झाले जगातील सर्वात उंच हॉटेल, सर्वात वर स्वीमिंग पूल
Ciel Dubai Marina: दुबईतील बुर्झ खलीफा सर्वांनाच माहित आहे. दुबईत एकापेक्ष एक गगनचुंबी इमारती आहेत. आता पुन्हा एकदा दुबईने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 15 नोव्हेंबरला जगातील सर्वात उंच हॉटेल ‘Ciel Dubai Marina’ चे उद्घाटन होणार आहे. हे 377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचे अद्भुत मिश्रण आहे.
दुबईची नवी ओळख
‘Ciel Dubai Marina’ हे हॉटेल ‘द फर्स्ट ग्रुप’ या प्रसिद्ध हॉटेल चेनने बांधले आहे. 82 मजली ही इमारत कुतुब मिनारपेक्षा तब्बल पाच पट उंच आहे. या हॉटेलच्या डिझाइनचे काम पुरस्कार-विजेती आर्किटेक्चरल फर्म NORR हिने केले आहे. इमारतीत प्रचंड प्रमाणात काचेचा वापर करण्यात आला असून, ती दुबईच्या स्कायलाइनला आणखी आकर्षक बनवते.
हॉटेलची वैशिष्ट्ये
82 मजले आणि अत्याधुनिक आलिशान खोल्या.
प्रत्येक खोलीतून पाम जुमैरा आणि मरीना स्कायलाइनचा अप्रतिम नजारा.
76व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल.
81व्या मजल्यावर ‘Tattu Sky Lounge’
रुफटॉप ऑब्झर्व्हेशन डेक, येथून बुर्ज अल अरब, ऐन दुबई आणि संपूर्ण शहराचा 360 डिग्री व्ह्यू
या सुविधांमुळे हॉटेल दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (जगातील सर्वात उंच हॉटेल आणि सर्वात उंच इन्फिनिटी पूल असलेले हॉटेल) आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे.
खोलींच्या किंमती आणि बुकिंगचा क्रेझ
हॉटेलच्या उद्घाटनावेळी एका रात्रीसाठी खोलींची सुरुवातीची किंमत 1,310 दिरहम (सुमारे ₹30,000-₹31,000) इतकी ठेवण्यात आली आहे. तर प्रीमियम सुइट्स ज्यात मोठ्या जागा आणि विशेष लाउंज एक्सेस असून, त्याची किंमत 2,400 दिरहम (सुमारे ₹56,400) असेल. हॉटेल उघडण्याआधीच बुकिंग सुरू झाली असून मोठी मागणी दिसत आहे.
पर्यटनवाढीचा नवा अध्याय
दुबईने अलीकडच्या काळात आपल्या टूरिझम सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. 2024 मध्येच शहराने 1.7 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत केले. ‘Ciel Dubai Marina’च्या उद्घाटनानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.