चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:24 IST2025-07-17T18:23:30+5:302025-07-17T18:24:41+5:30
याशिवाय, संबंधित युक्रेनियन तरुणाने, संबंधित विद्यार्थिनीसोबतचे आपले खाजगी फोटोही ऑनलाइन शेअर केले होते, असेही बोलले जात आहे.

चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
चीनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका विद्यापीठाने एका चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून विद्यापीठातून काढून टाकल्याचे वृत्त आहे. या कृतीमुळे विद्यापीठावर जोरदार टीका होत आहे. याशिवाय, संबंधित युक्रेनियन तरुणाने, संबंधित विद्यार्थिनीसोबतचे आपले खाजगी फोटोही ऑनलाइन शेअर केले होते, असेही बोलले जात आहे.
काउंटर स्ट्राइक खेळाडूसोबत वन नाईट स्टँडमध्ये सहभागी होती विद्यार्थिनी -
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, २१ वर्षीय विद्यार्थ्याने ३७ वर्षीय माजी काउंटर-स्ट्राइक खेळाडू डेनिलो तेस्लेन्कोसोबत वन-नाईट स्टँडमध्ये सहभागी होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. संबंधित वृत्तानुसार, ८ जुलै रोजी डेलियन पॉलिटेक्निक विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, संस्थेने १६ डिसेंबर २०२४ रोजीच 'गैरवर्तनुकी'मुळे संबंधित विद्यार्थिनीला विद्यापीठातून काढून टाकण्याचे निश्चित केले होते.
विद्यार्थ्यावर 'राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का' पोहोचवल्याचा आरोप -
संबंधित विद्यार्थ्यावर 'राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का' पोहोचवल्याचा आरोप आहे. संबधित वृत्तानुसार, तेस्लेन्कोने त्याच्या फॅन ग्रूपवर विद्यार्थिनीसोबतचे काही खाजगी फोटोही शेअर केले होते. यानंतर आता, विद्यापीठाने विद्यार्थिनीला दिलेल्या या शिक्षेबद्दल सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, विद्यापीठाकडून एक निवेदन जारी करत, विद्यार्थिनी या निर्णयाविरोधात ७ सप्टेंबरपर्यंत अपील करू शकते, असेही म्हणण्यात आले आहे.
तरतुदींनुसार, कोणतेही कारण संबंधित विद्यार्थिनीला लागू होत नाही -
महत्वाचे म्हणजे, तरतुदींनुसार, विद्यार्थ्याला केवळ ८ कारणांमुळेच विद्यापीठातून काढता येते आणि यांपैकी कोणतेही कारण संबंधित विद्यार्थिनीला लागू होत नाही. यामुळे तिला, कायदेशीर मदत घेण्याचा सल्लाही दिला जात आहे.