चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 08:41 IST2025-10-01T08:41:02+5:302025-10-01T08:41:18+5:30
ती चीनची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी ती मूळची पाकिस्तानची आहे. सध्या तिची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.

चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
आज ती एक प्रसिद्ध सेलेब्रिटी आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या नुसत्या एका दर्शनासाठी ते तिच्यावर जीव ओवाळून टाकतात. तिचं नाव फॅन जिहे. ती चीनची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी ती मूळची पाकिस्तानची आहे. सध्या तिची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
फॅनची कहाणी कुठल्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. मूळची ती पाकिस्तानची, मग ती चीनला कशी गेली? तिथली सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर कशी झाली? तिचे एवढे चाहते का आहेत? आणि आज चाहत्यांनी तिला डोक्यावर का घेतलं आहे?
फॅन जिहेला सध्या लाखो फॉलोअर्स असले तरी तशी ती 'एकटी'. तिला तिच्या आईचं नाव माहीत नाही, वडिलांचं नाव माहीत नाही. 'सख्खा' एकही नातेवाईक तिला नाही. त्यांच्याशी तिची कोणतीच नाळ नाही. ते कुठे आहेत, 'आहेत' की नाहीत, हेदेखील तिला माहीत नाही. कारण ती 'अनाथ' होती! फॅन जेव्हा जन्माला आली तेव्हा तिला एका बॉक्समध्ये टाकून पाकिस्तानात ठिकाणी बेवारस फेकून दिलं होतं. त्यानंतर एका चिनी दाम्पत्यानं तिला दत्तक घेतलं आणि पाकिस्तानातून ती चीनमध्ये आली. तिथे आल्यावर तिचं भाग्यच बदललं. दोन वर्षापूर्वी ती अधिकच प्रसिद्ध झाली. त्यालाही एक छोटंसं निमित्त ठरलं. नूडल्स खातानाचा तिचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर ती क्षणार्धात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिचे तब्बल १८ लाखांहून अधिक फॉलोअर झाले आणि ती ग्रामीण चीनची स्टार बनली.
आता ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं कारण म्हणजे आपल्याच एका चाहत्याशी, फॉलोअरशी तिनं नुकतंच लग्न केलं. त्यामुळे केवळ चीन, पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
या दोघांची प्रेमकहाणीही अनोखी आहे. दोघांची पहिली भेट मित्रांच्या ओळखीतून झाली. कालांतरानं ही ओळख प्रेमात बदलली. एकमेकांसाठी कोणी काय त्याग करायचा, हा प्रश्न त्यांच्याबाबत आला नाही. कारण फॅनच्या चाहत्यानं स्वतःच ठरवलं की फॅनची लोकप्रियता आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे. तिची कमाईदेखील आपल्या कैक पट आहे. त्यामुळे त्यानं स्वतःहून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि फॅनच्या कामात मदत करण्याचा, तिच्या वाढत्या लोकप्रियतेला आधार देण्याचा निर्णय त्यानं घेतला. आता तो तिच्यासोबत राहून तिचे व्हिडीओ एडिट करतो, तिचा सोशल मीडिया सांभाळतो आणि तिच्या आईवडिलांना शेतात मदतही करतो.
फॅन आपल्या सौंदर्यानं आणि त्याचवेळी आपल्या साधेपणानंही खूप प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी एक वेगळ्याच प्रकारचं काम करते. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून ती शेतीचं ऑनलाइन प्रमोशन करते. ग्रामीण जीवनावर आधारित तिच्या व्हिडीओंनी लोकांचं मन जिंकलं आहे.
फॅन आणि तिचा प्रियकर तब्बल तीन वर्ष सोबत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा केली आणि नुकतंच लग्नही केलं. त्यांनी लग्नही अतिशय साधेपणानं केलं. चाहत्यांच्या प्रेमापोटी आणि मागणीमुळे त्यांनी आपल्या लग्नाचंही लाइव्ह स्ट्रीमिंग केलं. दोघांच्या साधेपणामुळे आणि फॅनच्या कहाणीमुळे जगभरातील तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.