Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:28 IST2025-12-18T16:25:56+5:302025-12-18T16:28:46+5:30
Chinese Bodybuilder Wang Kun Dies at 30: चीनचे प्रसिद्ध बॉडीबिल्डर वांग कुन यांचा वयाच्या ३० वर्षी निधन झाल्याने संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे.

Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
कठोर परिश्रम आणि आपल्या अफाट शरीरयष्टीच्या जोरावर जागतिक फिटनेस विश्वात नाव कमावणारे चीनचे प्रसिद्ध बॉडीबिल्डर वांग कुन यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले. वांग कुन यांच्या निधनाने संपूर्ण जगाला हादरुन सोडले असून फिटनेससाठी धडपडणाऱ्या तरुणांना मोठा धक्का बसला आहे.
अन्हुई प्रांतीय बॉडीबिल्डिंग असोसिएशनने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वांग कुन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, निधनाच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत ते पूर्णपणे निरोगी आणि अॅक्टिव्ह दिसत होते. वांग कुन हे त्यांच्या अत्यंत कडक शिस्तीसाठी ओळखले जात होते. त्यांनी कधीही दारुला स्पर्श केला नाही, पार्ट्यांपासूनही दूर राहीले, रात्री लवकर झोपायचे. त्यांचा आहारही साधा होता. त्यांनी अनेकदा स्वतःच्या जीवनशैलीचे वर्णन संन्यासी जीवनासारखे केले होते.
चायनीज बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सलग ८ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली छाप सोडली आहे. वांग हे एक यशस्वी उद्योजक होते आणि ते आपल्या गावी मसल फॅक्टरी नावाची जिम चालवायचे. लवकरच ते आपली दुसरी जिम सुरू करणार होते, ज्याला त्यांनी आपल्या आयुष्यातील 'एक नवीन सुरुवात' म्हटले होते. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वांग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.