भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:57 IST2025-12-31T07:56:15+5:302025-12-31T07:57:01+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे.

भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता चीननेही या वादात उडी घेतली आहे. यावर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीनने मध्यस्थी केल्याचा खळबळजनक दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. मात्र, भारताने नेहमीप्रमाणे कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली असून, हा वाद द्विपक्षीय चर्चेतून सुटल्याचे स्पष्ट केले आहे.
वांग यी यांचा दावा काय?
बीजिंगमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना वांग यी म्हणाले की, "यावर्षी जगभरात सीमावाद आणि संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती पहिल्यांदाच इतकी गंभीर आहे. अशा परिस्थितीत चीनने जगातील अनेक हॉटस्पॉट मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये उत्तर म्यानमार, इराण अणुकरार, इस्रायल-पॅलेस्टाईन आणि विशेषतः भारत-पाकिस्तानमधील तणावाचा समावेश आहे." चीनने कायम शांततेच्या बाजूने भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मे महिन्यातील तो धगधगता संघर्ष
या दाव्यामागे मे महिन्यातील भारत-पाक सीमेवरील तणावाचे संदर्भ दिले जात आहेत. ७ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली होती. यामुळे दोन्ही देशांत १० मेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. हा संघर्ष दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांच्या थेट चर्चेनंतर थांबला होता.
भारताची भूमिका स्पष्ट: तिसऱ्याची गरज नाही!
चीनच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याआधी अनेकदा स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतचा कोणताही मुद्दा हा द्विपक्षीय आहे. ७ ते १० मे दरम्यान झालेला संघर्ष हा कोणत्याही मध्यस्थीमुळे नव्हे, तर दोन्ही देशांच्या लष्करातील थेट संवादामुळे निवळला होता, असा भारताचा ठाम विश्वास आहे. अमेरिकेनेही यापूर्वी असाच दावा केला होता, जो भारताने फेटाळून लावला होता.
चीनच्या दाव्यामागे राजकारण?
चीन सध्या जागतिक स्तरावर आपली प्रतिमा एक 'शांतता दूत' म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्यानमार, कंबोडिया आणि थायलंडच्या वादातही आपण मध्यस्थी केल्याचे वांग यी यांनी आवर्जून सांगितले. मात्र, भारतासारख्या बलाढ्य देशाच्या अंतर्गत आणि द्विपक्षीय विषयात चीनने असा दावा करणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.