आमच्याकडे या, तगडा पगार देऊ! टॉप इंजिनीयर्सना चीनची ऑफर; ड्रॅगनचा डेंजर प्लान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 21:58 IST2022-05-04T21:58:27+5:302022-05-04T21:58:49+5:30
बड्या इंजिनीयर्सना गळाला लावण्यासाठी चिनी कंपन्या प्रयत्नशील; मोठ्या पगाराच्या ऑफर्स

आमच्याकडे या, तगडा पगार देऊ! टॉप इंजिनीयर्सना चीनची ऑफर; ड्रॅगनचा डेंजर प्लान
बीजिंग: विस्तारवादी धोरणावर सातत्यानं काम करत असलेल्या चीननं तैवानचा घास घेण्यासाठी नवी योजना आखली आहे. संवादाच्या माध्यमातून तैवानला मुख्य भूमीशी जोडू, असं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उघडपणे म्हटलं आहे. तर चिनी लष्कराचे प्रमुख, कम्युनिस्ट पक्षाचे बडे नेते तैवानवर सैनिकी कारवाई करण्याची धमकी देत आहेत. आता चिनी कंपन्या तैवानच्या अभियंत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
तैवानमधील सेमीकंडक्टर अभियंत्यांना आणि एक्झिक्युटिव्हसना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चिनी कंपन्यांनी सुरू केला आहे. त्यासाठी कंपन्या मोठ्या पगाराचं आमिष दाखवत आहेत. पगार अधिक मिळत असल्यानं काही तैवानी अभियंते इच्छा नसतानाही चिनी कंपन्यांसाठी काम करत आहेत.
तैवानमधील टॉपच्या अभियंत्यांना चिनी कंपन्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देत आहेत. पैशांच्या मोहात अडकून अभियंते चिनी कंपन्यांकडे गेल्यास त्यांच्यासोबत काही व्यापारी गुपितंदेखील चीनकडे जातील, अशी भीती तैवानला वाटत आहे. याचा फटका तैवानच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो.
तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरची निर्मिती होते. २०२० मध्ये तैवानच्या एकूण निर्यातीत सेमीकंडक्टरचं प्रमाण तब्बल ३५ टक्के होतं, अशी आकडेवारी नॅशनल यांग मिंग चियाओ तुंग विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या एरिक यी-हंग चिऊ यांनी सांगितली. सेमीकंडक्टरच्या निर्मितीत तैवानचं असलेलं वर्चस्व पाहून चीनच्या काही कंपन्या तैवानी अभियंत्यांना गळाला लावत आहेत. त्यासाठी गलेलठ्ठ पगाराच्या ऑफर दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.