अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:11 IST2025-05-20T14:10:49+5:302025-05-20T14:11:42+5:30
चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुरावा कमी करू इच्छितो. याआधी काबुलमध्येही तिन्ही देशाचे प्रतिनिधी भेटले होते

अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
बीजिंग - पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानचे तालिबानी परराष्ट्र मंत्री बीजिंगमध्ये भेटणार आहेत. ही भेट अशावेळी होत आहे जेव्हा ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आणि चीनची पोलखोल झाली. चीनने पाकिस्तानला शस्त्रे दिली आणि सैन्य कारवाई मदतीचं आश्वासन दिले होते मात्र भारताच्या कारवाईने भूमिका स्पष्ट झाली. आता भारत अफगाणिस्तानच्या माध्यमातून दुसरा मोर्चा उघडू शकते याची भीती पाकिस्तानला आहे. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतली त्यामुळे पाकिस्तानची भीती आणखी वाढली आहे.
पाकिस्तानची ही भीती दूर करण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. चीनमध्ये तालिबानी आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री भेटतील त्यांच्यात भारताच्या भूमिकेवरून चर्चा होईल. पाकिस्तान, चीन आणि तालिबान यांच्यात त्रिपक्षीय बैठक आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये तिथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतील. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणाव कमी करण्याचं काम करत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी अफगाणिस्तानवर दबाव टाकतील. टीटीपी दहशतवाद्यांना अफगाणिस्तानचा पाठिंबा मिळत आहे जे सातत्याने पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर हल्ले करतात असा पाकिस्तानचा आरोप आहे.
चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुरावा कमी करू इच्छितो. याआधी काबुलमध्येही तिन्ही देशाचे प्रतिनिधी भेटले होते. चीनचे राजदूत यांनी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात मैत्री करण्याचा प्रयत्न केला. भारत सातत्याने तालिबानवर प्रभाव वाढवत असल्याचे पाकिस्तानला वाटते. रशियाही अफगाणिस्तानात वेगाने पाय रोवत आहे त्याची भीती चीनला आहे. अलीकडेच रशियाने तालिबानसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यातून भारताला फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. चीनची नजर अफगाणिस्तानच्या लिथियम आणि सोने यासारख्या खजिन्यावर आहे. त्यामुळे चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक वाढवत आहे.
दरम्यान, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्या काबुल यात्रेनंतर तालिबानी सरकार भारत-अफगाणिस्तान यांच्यातील प्रभाव कमी करण्यावर सहमत झाल्याचा दावा पाक मीडियाने केला. परंतु हा दावा खोटा निघाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये तालिबानने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. पाकिस्तानी राजदूताने तालिबान सरकारला विनंती करत पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा द्यावा असं म्हटलं परंतु सरकारने ते केले नाही. त्यामुळे पाकिस्तानला झटका बसला. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातही अनेकदा संघर्षाची वेळ आली आहे.