चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 21:58 IST2023-06-20T21:57:44+5:302023-06-20T21:58:24+5:30
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती

चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं
नवी दिल्ली - दहशतवादाबाबत भारताचा शेजारील देश चीनचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. दहशतवादी साजिद मीरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश चीनने रोखला आहे. भारत आणि अमेरिकेने मीरला या यादीत स्थान देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र चीनने त्यावर व्हिटो केला आहे. साजिद मीर हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील वॉण्टेड दहशतवादी आहे.
साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चीनने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला संयुक्त राष्ट्रात जागतिक दहशतवादी म्हणून नामांकित करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला आहे. बीजिंगने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंध समितीच्या अंतर्गत मीरला जागतिक दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकणे, मालमत्ता गोठवणे, शस्त्रास्त्रबंदी या प्रतिबंधाविरोधात अमेरिकेने सादर केलेल्या प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला. मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेवरून अमेरिकेने त्याच्यावर ५ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस ठेवले होते.
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती. साजिद मीरला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादाशी संबंधित एका वरिष्ठ वकिलाने सांगितले होते की, जूनच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.
पाकनं केला होता मीर मेल्याचा दावा
डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, परंतु अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी पाकिस्तानवर शंका उपस्थित केली होती. पाकिस्तानने साजिद मीरच्या मृत्यूचे पुरावे सादर करावेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानने अचानक २१ एप्रिल २०२२ रोजी साजिद मीरला अटक केल्याचा दावा केला त्यानंतर १६ मे २०२२ रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आणि लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात पाठवण्यात आले.