कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने फोडली डरकाळी, खलिस्तानी समर्थकांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:05 IST2024-06-21T15:04:50+5:302024-06-21T15:05:11+5:30
Canadian Parliament : कॅनडाच्या संसदेत मंगळवारी खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरसाठी मौन पाळण्यात आले.

कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने फोडली डरकाळी, खलिस्तानी समर्थकांना फटकारले
Canadian Parliament : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. मंगळवारी(दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले. यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे, तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेली त्यांनी 1985 मध्ये एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली. तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले. 23 जून 2024 रोजी राजधानी ओटावा येथील डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रा संसदेत बोलताना म्हणाले की, खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. 23 जून हा दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा स्मृतिदिन आहे. 39 वर्षांपूर्वी याच दिवशी एअर इंडियाचे विमान हवेत असताना उडवण्यात आले होते. त्या घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यात एकूण 268 कॅनेडियनही ठार झाले होते. नुकतंच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला. यावरुन देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही केली.