कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:45 IST2025-10-29T11:42:49+5:302025-10-29T11:45:46+5:30
Canada Crime: दर्शन सिंग यांच्यावर राहत्या घराबाहेर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या.

कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
Canada Crime: कॅनडाच्या सरी (Surrey) शहरात राहणाऱ्या पंजाबी उद्योगपती दर्शन सिंग साहसी (Dharshan Singh Sahsi) यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मूळ भारतीय असलेले दर्शन सिंग हे कॅनडात टेक्सटाइल रीसायकलिंग व्यवसायाशी संबंधित होते. घटनेनंतर कॅनडा पोलिसांनी तपास सुरू केला असून, खंडणी आणि वैयक्तिक वैर, या दोन्ही अंगाने चौकशी सुरू आहे.
लुधियान्यातील दोराहाचे रहिवासी
दर्शन सिंग मूळचे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील दोराहा परिसरातील रहिवासी होते. अनेक वर्षांपूर्वी ते कॅनडाला स्थायिक झाले आणि आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी व्यवसायात मोठे यश मिळवले आणि टेक्सटाइल रीसायकलिंगचा मोठा व्यवसाय उभारला. त्यांच्या कारख्यान्यात शेकडो कर्मचारी कार्यरत होते. कॅनडातील भारतीय समुदायातही त्यांचा मोठा मान होता. ते समाजसेवा आणि दानधर्माच्या कार्यात सक्रियपणे सहभागी असायचे.
पोलिस काय म्हणाले?
कॅनडा पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर या हत्येमागे कोणत्याही गँगस्टर किंवा एक्स्टॉर्शन टोळीचा थेट सहभाग नसल्याचे म्हटले आहे. दर्शन सिंग यांच्या कुटुंबीयांनी देखील या संदर्भात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे की, ही हत्या एखाद्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून घडलेली असावी. कॅनडा पोलिसांकडून या प्रकरणाची युद्धपातळीवर चौकशी सुरू आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी घेतली
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित गुंड गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दर्शन सिंग यांच्याकडे त्यांच्या मोठ्या व्यवसायाच्या बदल्यात काही रक्कमेची मागणी करण्यात आली होती. मात्र दर्शन सिंग यांनी पैसे देण्यास नकार देत नंबर ब्लॉक केला. त्यामुळे ही हत्या करण्यात आली. दरम्यान, भारतीय समुदायात या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून, समाजातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.