शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:42 IST2025-11-24T16:40:41+5:302025-11-24T16:42:01+5:30
पाकिस्तानातील पेशावर शहरात भयंकर बॉम्बस्फोट करण्यात आला. या आत्मघाती हल्ल्यात तीन जवान मारले गेले, तर दोन लोक जखमी झाले आहेत.

शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
पाकिस्तानातील पेशावर शहर बॉम्बस्फोटाचे घटनेने हादरले. सोमवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवली आहे. कारण हा हल्ला निमलष्करी दलाच्या अर्थात फ्रंटियर कॉन्स्टॅबुलरी मुख्यालयाच्या बाहेरच करण्यात आला. बॉम्बस्फोट घडवून आणतानाचे फोटो आता समोर आले आहेत.
सुरक्षा कर्मचारी ड्युटीवर होते. दोन दहशतवादी आले आणि मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. ते सामान्य नागरिकासारखे दिसत होते. त्यांच्याकडे बघून कुणालाही शंका आली नाही.
एकाने आतून बॉम्ब असलेले जॅकेट घातलेले होते. तर दुसऱ्याने कुर्ता घातलेला होता आणि शाल अंगावर घेतली होती. जेणेकरून शरीरावर लावलेले बॉम्ब दिसू नये. जसा तो मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला, तसा त्याने डेटोनेटर दाबले आणि भयंकर मोठा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयंकर होता की, संपूर्ण परिसरात त्याचा आवाज ऐकायला आला आणि जमीनही हादरली. त्यानंतर सगळी धावाधाव सुरू झाली. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला.
पाकिस्तानी डॉन वृत्तपत्राला पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला सकाळी ८ वाजता करण्यात आला. सद्दार कोहाट रोडवरील गेटवर हा हल्ला झाला. आधी एकाने स्वतः बॉम्बने उडवून घेतले आणि नंतर काही दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, ते चकमकीमध्ये मारले गेले.
ज्या भागात ही घटना घडली, तो गर्दीचा भाग आहे. मात्र, सकाळ असल्याने इतकी गर्दी नव्हती. गेल्या काही काळात पाकिस्तान दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. १ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये दहशतवाद्यांनी न्यायालयात सुसाईड बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात १२ लोक मारले गेले होते.