बॉम्ब स्फोटाने पुन्हा हादरला पाकिस्तान; ५ पोलिसांचा मृत्यू, २० पेक्षा अधिक नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:30 IST2024-01-08T13:26:00+5:302024-01-08T13:30:42+5:30
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून सीमेलगतच्या प्रदेशात हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बॉम्ब स्फोटाने पुन्हा हादरला पाकिस्तान; ५ पोलिसांचा मृत्यू, २० पेक्षा अधिक नागरिक जखमी
Pakistan Blast ( Marathi News ) :पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा या प्रदेशात आज बॉम्ब स्फोट झाला असून यामध्ये पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसंच या हल्ल्यात २० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. बाजौर जिल्ह्यातील अँटी पोलिओ अभियानासाठी ट्रकमधून ड्युटीवर जात असलेल्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी पोलिसांवर हा भयंकर हल्ला करण्यात आला, ते ठिकाणी अफगाणिस्तानच्या सीमेलगत आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पकड घट्ट केल्यापासून या सीमेवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठीच आजचा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये पाच पोलिसांनी आपले प्राण गमावल्याची माहिती आहे. तसंच २०हून अधिक जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारीही चार जणांचा झाला होता मृत्यू
खैबर पख्तूनख्वा इथं रविवारीदेखील दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जण जागीच ठार झाले होते. पाराचिनार ते पेशावर या महामार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीद्वारे अंदाधुंद गोळीबार केला होता.
दरम्यान, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशात २०२३ या एका वर्षात तब्बल ४१९ दहशतवादी हल्ले झाले असून त्यामध्ये ६२० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३०६ पोलीस, २२२ सामान्य नागरिक आणि ९२ दहशतवाद्यांचा समावेश आहे.