तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:33 IST2026-01-10T11:31:56+5:302026-01-10T11:33:01+5:30
तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड हिंसाचार झाला असून, आतापर्यंत २१७ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत रौद्र आणि हिंसक रूप धारण केले आहे. महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध सुरू झालेली ठिणगी आता थेट धार्मिक नेतृत्वाविरुद्धच्या वणव्यात रूपांतरित झाली आहे. राजधानी तेहरानसह देशातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड हिंसाचार झाला असून, आतापर्यंत २१७ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे इराण सरकारने संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा खंडित केली आहे.
महागाईच्या विरोधात सुरू झाला होता लढा
या जनक्षोभाची सुरुवात २९ डिसेंबर २०२५ रोजी झाली होती. इराणच्या चलनाची (रियाल) घसरण आणि वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला तेहरानमध्ये दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले. ३० डिसेंबरला विद्यार्थीही या आंदोलनात सामील झाले. मात्र, हळूहळू या आंदोलनाचा रोख बदलला आणि लोक थेट सत्तेतील धार्मिक नेतृत्वाच्या विरोधात रस्त्यावर उतरले.
हॉस्पिटल्समध्ये मृतदेहांचा ढिगारा
तेहरानमधील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फक्त ६ मोठ्या रुग्णालयांमध्ये २१७ मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतेकांचा मृत्यू गोळीबारात झाला आहे. आंदोलनात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोक सहभागी झाले असून २ हजारांहून अधिक जण जखमी आहेत. या संघर्षात इराणच्या सुरक्षा दलातील १४ जवानही मारले गेले आहेत.