अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:00 IST2025-07-25T10:58:58+5:302025-07-25T11:00:34+5:30
Ashish Shelar News: अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
Ashish Shelar News: अमेरिकेतील मराठीशाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठीशाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन २००५ पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे ३०० विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत. अमेरिकेत अशा ५० हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत.
अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.