ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 02:31 IST2025-07-02T02:30:58+5:302025-07-02T02:31:24+5:30
सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे.

ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मंगळवारी मोठा कायदेशीर विजय झाला आहे. अमेरिकन सिनेटमध्ये त्यांचे महत्त्वाकांक्षी, कर सवलत आणि सरकारी खर्चात कपात करण्यासंदर्भातील विधेयक 'वन बिग ब्युटीफुल' मंजूर झाले आहे. महत्वाचे म्हणजे, या बिलावरूनच अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासोबतचे संबंध ताणले गेले असतानाच ट्रम्प यांना हा विजय मिळाला आहे. तत्पूर्वी, हे विधेयक मंजूर झाले, तर आपण अमेरिकेत एक नवीन पक्ष स्थापन करू, असे मस्क यांनी म्हटले होते. यावर, ट्रम्प यांनी त्यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची धमकी दिली आहे.
जेडी वेन्स यांचे मत ठरले निर्णायक -
सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे.
काय आहे या विधेयकात? -
या विधेयकात, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देण्यात आलेली कर कपात ४.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (सुमारे ३७३ लाख कोटी रुपये) वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याच बरोबर, मेडिकेड आरोग्य कार्यक्रमात १.२ ट्रिलियन डॉलर्सची (सुमारे ९९६ लाख कोटी रुपये) कपात केली जाईल. यामुळे, सुमारे १.२ कोटी गरीब आणि दिव्यांग अमेरिकन लोकांच्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आहे.
पुढचा टप्पा, 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज' -
हे विधेयक आता अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, म्हणजेच प्रतिनिधी सभागृह ('हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'मध्ये) जाईल. येथे काही डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन खासदारांच्या विरोधामुळे आव्हान मिळू शकते. विशेषतः आरोग्यसेवा आणि अन्न सहकार्य कपातीसंदर्भात विरोध होऊ शकतो. हे विधेयक म्हणजे, ट्रम्प यांच्या अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे.
काय म्हणाले होते मस्क? -
हे विधेयक इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट संपवणे आणि सामाजिक सेवांवरील खर्च कमी करणे यासारख्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. यासंदर्भात इलॉन मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, "हे विधेयक मंजूर झाले तर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांना नवीन पर्याय शोधावा लागेल," असे म्हटले होते.