मोठी बातमी! लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या तळावरच इस्रायलने हल्ला चढविला; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 06:07 IST2026-03-07T06:06:03+5:302026-03-07T06:07:00+5:30
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा इस्रायलला इशारा! लेबनॉनमधील UN सैन्यावरील हल्ला अस्वीकार्य असल्याचे सांगत, सीरिया आणि लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याचे आवाहन. वाचा सविस्तर.

मोठी बातमी! लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या तळावरच इस्रायलने हल्ला चढविला; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन संतापले
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले आहे. दक्षिण लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या तळावर इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्याचा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे युद्ध आता मध्यपूर्वेच्या इतर भागांतही वेगाने पसरत असल्याच्या भीतीने जागतिक समुदायात चिंतेचे वातावरण आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शरा आणि लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या संवादानंतर मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट केली. "फ्रान्स आपल्या भागीदारांसह हा संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीरिया आणि लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला गेलाच पाहिजे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दहशतवादाला थारा नाही
मॅक्रॉन यांनी पुढे म्हटले की, "सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या काळात दहशतवादाला कोणतीही जागा मिळता कामा नये. प्रदेशातील प्रत्येक देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी फ्रान्स सर्वतोपरी प्रयत्न करेल." इस्रायलने थेट संयुक्त राष्ट्रांच्या तळाला लक्ष्य केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे.
UN दलाचे समर्थन:
दक्षिण लेबनॉनमध्ये शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे दल (UNIFIL) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या दलाच्या सदस्यांवर झालेला हल्ला ही गंभीर बाब असून, फ्रान्स या दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मॅक्रॉन यांनी दिली. या नव्या घडामोडींमुळे इस्रायल आणि पाश्चात्य देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युद्धाची व्याप्ती वाढतेय
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता लेबनॉन आणि सीरियापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण मध्यपूर्व आशियात युद्धाचा वणवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्ससारख्या जागतिक महासत्तेने घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.