इस्रायल की इराण; सर्वात मजबूत हवाई संरक्षण कोणाकडे? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:56 IST2026-03-01T18:55:22+5:302026-03-01T18:56:25+5:30
Best Air Defence System: इराण-इस्रायल युद्धात ‘एअर डिफेन्स’ची कसोटी; कोणाकडे आहे भक्कम ढाल?

इस्रायल की इराण; सर्वात मजबूत हवाई संरक्षण कोणाकडे? जाणून घ्या...
Best Air Defence System: अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेत सध्या पूर्णतः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत इस्रायलनेइराणवर सुमारे 1,200 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला जातोय. इराणनेही विविध ठिकाणी असलेल्या अमेरिकन लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या वाढत्या हल्ल्यांमुळे एअर डिफेन्स (हवाई संरक्षण) सिस्टिम किती प्रभावी असते, यावर चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत एक प्रश्न विचारला जातोय की, कोणत्या देशाकडे अधिक मजबूत हवाई सुरक्षा कवच आहे?
एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय?
एअर डिफेन्स सिस्टिमचा उद्देश शत्रूची क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट्स व लढाऊ विमाने हवेतच ओळखून नष्ट करणे हा आहे. या प्रणालीत रडार व सेन्सर्स लक्ष्य ओळखतात, कमांड-कंट्रोल सिस्टिम धोका ठरवते आणि इंटरसेप्टर मिसाइल्स हवेतच लक्ष्य भेदतात. आधुनिक युद्धात पहिला हल्ला बहुतेक वेळा आकाशातूनच होतो; म्हणूनच एअर डिफेन्स ही कोणत्याही देशाची पहिली संरक्षणरेषा मानली जाते.
संरक्षण बजेट व संसाधने
IISS आणि SIPRI सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांनुसार, इस्रायलचे संरक्षण बजेट सुमारे 19 अब्ज डॉलर्स आहे, तर इराणचे संरक्षण बजेट अंदाजे 7-8 अब्ज डॉलर्स आहे. बजेटच्या तुलनेत इस्रायल तंत्रज्ञान व अपग्रेड्सवर अधिक खर्च करतो. इराणकडे मानव संसाधनांची संख्या अधिक असल्याने दीर्घकालीन संघर्षात त्याला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
इस्रायलची एअर डिफेन्स प्रणाली
इस्रायलची हवाई सुरक्षा मल्टी-लेयर असल्याने ती जगात अत्यंत चर्चेत आहे.
1) आयरन डोम- लहान पल्ल्याचे रॉकेट्स व मिसाइल्स रोखण्यासाठी.
2) डेव्हिड्स स्लिंग- मध्यम पल्ल्याच्या व क्रूझ मिसाइल्सविरोधात वापरले जाते.
3) अॅरो-3- दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाइल्स हवेतच नष्ट करण्याची क्षमता.
4) आयरन बीम- लेझर-आधारित प्रणाली, कमी खर्चात जलद प्रतिसाद.
इराणची एअर डिफेन्स प्रणाली
1) S-300 PMU2- रशियन बनावटीची दीर्घ पल्ल्याची प्रणाली.
2) बावर-373- स्वदेशी दीर्घ पल्ल्याची प्रणाली.( ‘सैय्यद-4B’ मिसाइल; 300 किमी मारक क्षमता)
3) खोरदाद-15- मध्यम पल्ल्याची मोबाईल प्रणाली(85 किमी अंतरावर स्टेल्थ जेट शोधण्याचा दावा)
4) सेवोम खोरदाद- 105 किमी पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता(2019 मध्ये अमेरिकी ड्रोन पाडल्यानंतर चर्चेत)
दोन्ही देशांची हवाई ताकद
इज्रायल: 600+ विमाने (F-35I Adir, F-16I, F-15I); F-35 स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे आघाडी.
इराण: 500+ विमाने; अनेक जुनी मॉडेल्स (F-4, F-5, F-14). Su-35 खरेदीची योजना, पूर्ण तैनातीची पुष्टी नाही.