बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:56 IST2026-01-10T19:55:03+5:302026-01-10T19:56:03+5:30
अमेरिका ही भारतातील कपडे आणि टेक्सटाइलसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी २८-३०% निर्यात अमेरिकेला जाते.

बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
नवी दिल्ली - भारतीय गारमेंट इंडस्ट्रीला एक मोठा फटका बसण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेकडून ५०० टक्के टॅरिफ लावण्याच्या टांगत्या तलवारीने निर्यातीवर संकट ओढावले आहे. त्यातून फॅक्टरीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जर भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यास त्याचा जॅकपॉट बांगलादेशला मिळू शकतो. किंमत आणि प्रतिस्पर्धेत बांगलादेशला थेट फायदा होईल. जे खरेदीदार भारतात काही ऑर्डर देण्याचा विचार करत होते ते आता येत नाहीत असं कॉटन टेक्सटाइल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन विजय अग्रवाल यांनी म्हटलं.
विजय अग्रवाल म्हणाले की, आम्हाला विचारले जात आहे जर हा ५००% टॅरिफ लादला गेला तर काय होईल, त्याची हमी कोण देईल?. गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकेने लादलेल्या ५०% टॅरिफमधून उद्योग अद्याप पूर्णपणे सावरलेला नसताना आता ही नवी चिंता व्यक्त केली जात आहे. ५०% टॅरिफमुळे निर्यातदार आधीच अडचणीत आले होते. त्यांना मोठ्या प्रमाणात सवलती द्याव्या लागल्या, देशांतर्गत ब्रँडसाठी उत्पादन क्षमता वापरावी लागली आणि परदेशी ऑर्डर शेजारील देशांकडे वळवाव्या लागल्या. बुधवारी जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर ५०० टॅरिफ लादण्याचे विधेयक मंजूर केले आहे तेव्हा ही अनिश्चितता आणखी वाढली असं सांगण्यात येते.
बांगलादेशला लागेल लॉटरी
५०० टक्के टॅरिफ भारतावर लादल्यास बांगलादेशला लॉटरी लागेल. अमेरिकन खरेदीदारांसाठी भारतीय कपडे अचानक महाग होतील. याचा बांगलादेशला किंमत आणि स्पर्धात्मकतेच्या बाबतीत थेट फायदा होईल. गारमेंट सेक्टर खूप कमी नफ्यावर चालतो. परिणामी, अमेरिकन किरकोळ विक्रेते भारताला पर्याय म्हणून बांगलादेशकडे वळतील. बांगलादेशात कामगार खर्च आधीच कमी आहेत आणि कोणताही कर भार असणार नाही. या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय ब्रँडना त्यांच्या पुरवठा साखळ्या भारतातून बांगलादेशात हलवाव्या लागतील. यामुळे बांगलादेशी निर्यातदारांना भारताचा जागतिक बाजारपेठेतील वाटा उचलण्याची ऐतिहासिक संधी मिळेल.
अमेरिका भारताची सर्वात मोठी बाजारपेठ
अमेरिका ही भारतातील कपडे आणि टेक्सटाइलसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी २८-३०% निर्यात अमेरिकेला जाते. २०२४-२५ मध्ये भारताने ३७ अब्ज डॉलर्सचे कपडे आणि टेक्सटाइल निर्यात केले. ५० टक्के टॅरिफ लादल्यापासून या क्षेत्राला स्थिरता मिळण्यास संघर्ष करावा लागत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान कपड्यांच्या निर्यातीत फक्त २.२८% वाढ झाली तर टेक्सटाइल निर्यातीत २.२७% घट झाली हे भारतीय वस्त्रोद्योग संघटनेच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. या जोखमी असूनही उत्पादन थांबवणे हा पर्याय नाही असं उत्पादकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या शुल्काबाबतची परिस्थिती अजूनही खूपच अनिश्चित आहे, पण आपल्याला वस्तूंचे उत्पादन करावे लागेल. आपल्याला ही जोखीम घ्यावी लागेल असं व्यावसायिक सांगतात.
दरम्यान, ही परिस्थिती भारतीय वस्त्र उद्योगासमोर एक मोठे आव्हान निर्माण करत आहे. जे आधीच आर्थिक दबावांना तोंड देत आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. अशा शुल्कांमुळे केवळ उद्योगावरच नव्हे तर लाखो कामगारांच्या रोजीरोटीवरही परिणाम होऊ शकतो. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची अपेक्षा उद्योग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.