आधी तांदूळ मागितला अन् आता 180,000 टन डिझेल हवे; बांगलादेशने पुन्हा भारतासमोर हात पसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:10 IST2026-01-08T18:06:06+5:302026-01-08T18:10:43+5:30
भारत आणि बांगलादेशमधील संबंध गेल्या काही काळापासून बिघडले आहेत.

आधी तांदूळ मागितला अन् आता 180,000 टन डिझेल हवे; बांगलादेशने पुन्हा भारतासमोर हात पसरले
Bangladesh Diesel Import: हिंदूंवर होणारे हल्ल्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध गेल्या काही काळापासून बिघडले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील कट्टरतावादी बांगलादेश सरकार पाकिस्तानच्या बाजूने झुकत आहे. एकीकडे ते भारतावर टीका-टिप्पणी करत आहेत, तर दुसरीकडे भारताकडूनच मदत मागत आहेत.
2026 साठी आयातीला मंजुरी
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 2026 या वर्षात भारताकडून 1 लाख 80 हजार टन डिझेल आयात करणार आहे. हे डिझेल भारतातील सरकारी कंपनी Numaligarh Refinery Limited (NRL) कडून खरेदी केले जाईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत डिझेल आयात करण्याचा हा निर्णय बांगलादेश सरकारच्या खरेदीविषयक सल्लागार समितीने मंजूर केला आहे.
मंगळवारी (6 जानेवारी 2026) सचिवालयात झालेल्या बैठकीत वित्त सल्लागार सालेहुद्दीन अहमद यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये आर्थिक व्यवहारांवरील सल्लागार समितीने 2026 साठी इंधन आयातीस तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
सुमारे 14.62 अब्जाचा करार
बांगलादेशी माध्यमांच्या माहितीनुसार, या डिझेल खरेदी कराराची एकूण किंमत 119.13 दशलक्ष अमेरिकी डॉलर, म्हणजेच सुमारे 14.62 अब्ज बांगलादेशी टका इतकी आहे. करारानुसार प्रति बॅरल डिझेलचा मूळ दर 83.22 डॉलर निश्चित करण्यात आला आहे. हा दर आंतरराष्ट्रीय बाजारभावांवर आधारित असून, भविष्यात बाजारातील चढ-उतारानुसार त्यात बदल होऊ शकतो.
BPC आणि बँक कर्जातून होणार भुगतान
या आयातीसाठीचा खर्च बांगलादेशची सरकारी कंपनी Bangladesh Petroleum Corporation (BPC) आणि काही प्रमाणात बँक कर्जाच्या माध्यमातून भागवला जाणार आहे. यावरून बांगलादेश आपल्या ऊर्जा गरजांसाठी भारतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
आसामहून बांगलादेशपर्यंत डिझेलचा प्रवास
नुमालीगढ रिफायनरी ही भारतातील आसाम राज्यात स्थित आहे. येथून डिझेल प्रथम पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील मार्केटिंग टर्मिनलपर्यंत नेले जाईल. त्यानंतर बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या परबतीपूर डेपोपर्यंत पुरवठा केला जाईल.
‘बांगलादेश–भारत फ्रेंडशिप पाइपलाइन’चा वापर
डिझेलचा पुरवठा सुलभ आणि कमी खर्चात होण्यासाठी Bangladesh-India Friendship Pipeline चा वापर केला जाणार आहे. या पाइपलाइनमुळे वाहतूक खर्च कमी होईल, तसेच इंधन पुरवठा अधिक स्थिर आणि सुरक्षित राहणार आहे. महत्वाचे म्हणजे, याआधीही बांगलादेशने भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात केला आहे.